July 6, 2026

शक्तिपीठ महामार्गाचे काम जुन्या अलायनमेंटनुसारच करा

0

: आ. सुहास बाबर यांची विधानसभेत आग्रही मागणी

विटा, प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित नव्या अलायनमेंटमुळे शेतकरी, नागरिक आणि स्थानिकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन या महामार्गाचे काम जुन्या अलायनमेंटनुसारच करण्यात यावे, अशी ठाम मागणी आ. सुहास बाबर यांनी विधानसभेत केली.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आ. बाबर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या अलायनमेंटमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असून नागरिकांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक अल्प भूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सरकारने स्थानिकांच्या भावना, शेतकऱ्यांचे हित आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या अलायनमेंटनुसारच महामार्गाचे काम हाती घ्यावे. शक्तिपीठ महामार्गाबाबत खानापूर तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून सातत्याने विरोध व्यक्त केला जात आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित मार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती, ऊस, द्राक्ष, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्काळ थांबवावी, अशी मागणी आ. सुहास बाबर यांनी केली. यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आमदार सुहास बाबर यांच्या या मागणीमुळे शक्तिपीठ महामार्गाचा विषय विधानसभेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, सरकार याबाबत काय भूमिका घेते ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *