शिवसेनेकडून राधिका बागल मैदानात ; राजकीय हालचाली गतिमान
: जिल्हा बँकेसाठी राधिका बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महिला सर्वसाधारण गटातून अर्ज शिवसेनेचा अधिकच्या जागांवरील दावा प्रबळ
विटा : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक रंगात आली आहे. शिवसेनेच्या महिला नेत्या राधिका बागल यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. महिला सर्वसाधारण गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे शिवसेनेचा अधिकच्या जागांवरील दावा प्रबळ झाला आहे. हा अर्ज दाखल करताना आमदार सुहास बाबर, आटपाडीचे विद्यमान संचालक तानाजीराव पाटील व जिल्हाप्रमुख संजय विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील अ वर्ग सोसायटी गटातील दोन जागा सोडून अधिकच्या जागांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातून ओबीसी प्रवर्गातून अॅड. संदीप मुळीक यांचा अर्ज यापूर्वीच दाखल झाला आहे. गुरुवारी राधिका दिलीपराव बागल यांचा अर्ज दाखल करून शिवसेनेने आपला दावा अधिकच प्रबळ केला.राधिका बागल या दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निकटवर्तीय, दिवंगत उपसभापती निवृत्ती बागल यांच्या सून आहेत. त्यांनी पाच वर्षे लेंगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून काम पाहिले आहे.यावेळी लेंगरेचे ज्येष्ठ नेते सुनील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, युवा नेते प्रकाश बागल, आसिफ देसाई हर्षवर्धन बागल, उपसरपंच इजाज देसाई, प्रगतशील शेतकरी आबासाहेब बागल दिपक मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महिलांना प्राधान्य मिळावे“
: आमदार सुहास भैय्या बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली महिला सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बँकेत शिवसेनेला अधिकच्या जागा मिळाल्या पाहिजेत, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विचाराने आम्ही काम करीत आहोत. महिला शेतकऱ्यांच्या समस्या आम्हाला माहीत आहेत. त्या सोडविण्यासाठी संचालक मंडळात शेतकरी महिलेला प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. आमचे नेते बाबर बंधूंचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल.” –
राधिका बागल, (माजी सरपंच, लेंगरे )
