कर्मवीरांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली : डॉ. एम. बी. शेख

0
file_0000000034e48211811f13b642c502a7
Spread the love

विटा (प्रतिनिधी) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘कमवा आणि शिका’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांची आजच्या काळातही तितकीच प्रासंगिकता असून, विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि समतेची मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एम. बी. शेख यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज, विटा येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य केवळ एका संस्थेपुरते मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारे आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घडणारे विद्यार्थी महाराष्ट्राची परिवर्तनवादी व पुरोगामी विचारसरणी अधिक गतिशील करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी दक्षिण विभागीय अध्यक्ष मा. माधवराव (दादा) मोहिते होते, तर सावळज येथील श्री. आर. आर. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रम व उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

अध्यक्षीय मनोगतात माधवराव (दादा) मोहिते यांनी कर्मवीर अण्णांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख मान्यवरांचा परिचय बळवंत कॉलेजचे प्र. प्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत बोबडे यांनी केले. यावेळी ॲड. सुभाष पाटील, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद तपासे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. राणी किर्दत, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मरे, ज्युनिअर विभागाचे प्रमुख प्रा. अजित साळुंखे, आयक्यूएसी प्रमुख प्रा. राहुल पाटील यांच्यासह विटा रयत संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार विटा हायस्कूल, विटा व संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. एस. जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. प्रियांका शिंदे व प्रा. कोमल धुमाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *