युवा महोत्सवात मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाची दमदार कामगिरी

0
yuva_mahotsav_feature_200kb
Spread the love

नऊ कलाप्रकारांत यश; सुगम गायनात प्रथम क्रमांक

कडेगाव, प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात महाविद्यालयाने नऊ कलाप्रकारांत यश मिळवले. सुगम गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यशात मानाची भर घातली.

या महोत्सवात सुमारे २६० महाविद्यालयांनी ३६ कलाप्रकारांत सहभाग घेतला होता. मातोश्री महाविद्यालयाने त्यापैकी १७ कलाप्रकारांत सहभाग नोंदवला. सुगम गायनात प्रथम, शास्त्रीय गायन व मेहंदीमध्ये द्वितीय, भारतीय समूहगीत, पथनाट्य व लघुनाटिकेत तृतीय, पोस्टर व नाट्यसंगीतात चतुर्थ, तर सांस्कृतिक शोभायात्रेत पाचवा क्रमांक मिळवला.

यापूर्वी सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवात महाविद्यालयाने सांघिक सर्वसाधारण फिरता चषक पटकावला होता. जिल्हास्तरीय यशानंतर मध्यवर्ती युवा महोत्सवातही विद्यार्थ्यांनी आपली कला आणि गुणवत्ता सिद्ध केली. या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी विद्यार्थी-कलाकारांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद मिळाले नाही, म्हणजे अपयश आले असे नव्हे; तर स्पर्धेत सहभागच न घेणे हे खरे अपयश आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना अभिव्यक्तीची संधी दिली पाहिजे.”

महोत्सवासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शीला मोहिते, आयक्यूएसी समन्वयक डॉ. महेश माळी, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. मच्छिंद्र कुंभार, डॉ. जयंत विधाते, प्रा. वहीदा शेख, प्रा. नीता शिंदे आणि प्रा. रूपाली येवले यांनी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन व सहकार्य केले.

या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी-कलाकारांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *