आ. सुहास बाबर आक्रमक; लोकांचा संताप थेट विधानसभेत मांडला
विटा, प्रतिनिधी
विधानसभा नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेत आमदार सुहास बाबर यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेत राज्य शासनाकडे वीज, पायाभूत सुविधा आणि महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

आमदार बाबर म्हणाले की, गेल्या काही वर्षांत त्यांच्या मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी लिफ्ट इरिगेशन योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभू योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे हजारो एकर शेती ओलिताखाली आली आहे. तसेच सहाव्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर आहे. मतदारसंघात विटा–रहिमतपूर–सातारा, विटा–तासगाव–कवठेमहांकाळ–कोल्हापूर तसेच मायणी–झरे–दिघंची–पंढरपूर या रस्त्यांची तसेच इतर महत्त्वाच्या रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दीड वर्षांत हॅम च्या माध्यमातून सुमारे १४२ किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू असून एडीबीच्या माध्यमातून विटा–कलेढोण रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील तीन प्रमुख बसस्थानकांची कामे सुरू असून तीन मोठ्या शहरांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच मतदारसंघात नऊ नवीन वीज उपकेंद्रे (सबस्टेशन) उभारण्यात आली असून सुमारे ७० टक्के नागरिकांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वीज व्यवस्थेबाबत बोलताना आमदार बाबर यांनी वाढत्या वीज कनेक्शनमुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार निकामी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे ६३ केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर १०० केव्हीए क्षमतेचे करण्यात यावेत तसेच त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
स्मार्ट मीटर योजनेवर बोलताना त्यांनी सांगितले की, या संदर्भात काल दिघंची येथे मोठे आंदोलन झाले. प्रत्येक गावात सुरुवातीला पाच ते दहा स्मार्ट मीटर प्रायोगिक तत्त्वावर बसवावेत. अनेक घरांतील जुने वायरिंग लिकेज दाखवत असल्याने नागरिकांचे वीजबिल वाढत आहे. त्यामुळे महावितरणने अशा घरांतील वायरिंग बदलण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
२०११ ते २०१३ या कालावधीत सांगली जिल्ह्यात सुमारे चार हजार वीज जोडण्या केबलद्वारे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षिततेचा धोका निर्माण होत असून या सर्व ठिकाणी स्वतंत्र वीजवाहिन्या टाकून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून नवीन पद्धतीने वीज जोडण्या द्याव्यात. तसेच राज्यातील लोडशेडिंग पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मतदारसंघातील नऊ सबस्टेशनची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी त्या ठिकाणी 9 पैकी 5 सब स्टेशनवर 5 एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, तर तीन ठिकाणी 10 एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली.
याशिवाय चिखलहोळ गावातील महसूल प्रश्नही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. हे गाव पूर्वी औंध संस्थानात असल्याने आजही काही जमिनींवर देवस्थानाचा उल्लेख कायम असून संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर जमीन शून्य दाखवली जाते. त्यामुळे या जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करण्याबाबत शासनाने तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली.
