अन्ननलिकेत अडकलेले नाणे शस्त्रक्रियेतून बाहेर; मिरज सिव्हिलमध्ये चिमुकलीला नवजीवन
मिरज, (विनायक क्षीरसागर) : अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत अडकलेले एक रुपयाचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), मिरज येथील डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले.

कु. प्रणाली मनोळीकर या पाच वर्षीय बालिकेने २ जुलै रोजी एक रुपयाचे नाणे गिळले होते. हे नाणे अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकून बसल्याने तिला गिळण्यास आणि श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ लागला. विशेष म्हणजे, यापूर्वी तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि रक्त पातळ ठेवणारी औषधे सुरू असल्याने उपचार अधिकच जोखमीचे ठरत होते.त्रास वाढल्याने ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तिला मिरज सिव्हिलच्या शल्यचिकित्सा विभागात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एंडोस्कोपी सर्जन डॉ. प्रशांत दोरकर यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा निर्णय घेतला.
भूल देणेही धोकादायक असतानाही डॉ. प्रशांत दोरकर, डॉ. समरीन शेख, डॉ. स्नेहल सुपे, डॉ. आयुष चोरडिया तसेच भूलतज्ज्ञ डॉ. सुनिता शेंडे, डॉ. कात्यायनी गुरव, नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नातून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सुबोध उगाणे तसेच डॉ. संतोष दळवी आणि डॉ. प्रिया होबळकर यांनीही या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, अधीक्षक डॉ. प्रियंका राठी आणि डॉ. रुपेशकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी उपचारानंतर बालिकेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आणि मिरज सिव्हिल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
” शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, अधीक्षक डॉ. प्रियंका राठी आणि डॉ. रुपेशकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी उपचारानंतर बालिकेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आणि मिरज सिव्हिल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.”
