श्रीकांत शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होतील, आ. बाबर यांचे मोठे भाकित
विटा (प्रतिनिधी) : एका खाजगी वाहिनीशी बोलताना एका प्रख्यात अंकशास्त्र तज्ञाने खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होतील असे भाकीत व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे त्यांचे कर्तुत्व देखील बघितले तर हे भाकीत निश्चितपणे सत्य होईल असे वाटते, अशा आशयाची पोस्ट शिवसेनेचे खानापूर मतदार संघातील युवा आमदार सुहास बाबर यांनी सोशल मीडियात प्रसारित केली आहे. आमदार सुहास बाबर यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात चांगलीच वायरल झाली आहे.
आमदार सुहास बाबर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्यासाठी तसा फारसा वेळ मिळत नाही, पण काही दिवसांपूर्वी विटा ते आटपाडी प्रवासात सहजच एक रील पाहण्यात आलं. डॉ. श्रीकांत शिंदे हे आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील असं prediction ‘मुंबई तक’ या वाहिनीवर एका ख्यातनाम Numerologist नी केलं होतं. एक शिवसैनिक म्हणून हा माझ्यासाठी जसा सुखद धक्का होता, तसे ते एकप्रकारचे कुतूहलही होते.

भविष्यवाणीपेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवावा ही वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण! त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वर्तविलेल्या त्या भविष्यवाणीकडे तसे दुर्लक्ष झाले, पण नुकत्याच डॉ. शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीमुळे ही आठवण पुन्हा ताजी झाली.
मतदारसंघातील काही कामानिमित्त मी परवा दिल्लीला गेलो होतो, या दिल्लीवारीत तब्बल ६ ते ७ तासांसाठी डॉ. शिंदे यांचा सहवास लाभला. प्रत्येक समस्येकडे, प्रश्नाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा सर्वंकष विचार, संघटनेच्या वाढीसाठी नवनवीन संकल्पना, समोर आलेला प्रत्येक विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने हाताळण्याची सचोटी आणि कष्टाची प्रचंड तयारी… अशी त्यांची एक ना अनेक स्वभाववैशिष्ट्ये जवळून अनुभवता आली. त्यांची ही कार्यशैली पाहून मी अवाक झालो.
या भेटीदरम्यान विशेष जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर साहेबांचं टेक्नोसॅव्ही असणं. ते टेक्नॉलॉजीच्या वापरावर विशेष भर देतात. आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सतत इनोव्हेटिव्ह आयडियाज सुचवत असतात. Output किंवा रिझल्ट मिळवताना खासदार साहेब प्रसंगी परखडपणा, कठोरपणा दाखवितात. “अशा कठोरपणामुळे बऱ्याच वेळेला टीका टिप्पणीला सामोरं जावं लागतं, पण मी अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि कामाशी असणारी बांधिलकी जपतो” हे जेव्हा डॉक्टर साहेब स्वतः सांगतात, तेव्हा त्यातून त्यांची जनसेवेप्रति असणारी तळमळ जाणवते.
या भेटीदरम्यान ‘मुंबई तक’ या वाहिनीवर त्या ख्यातनाम Numerologist चे ते शब्द आठवले आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या राज्याचे भविष्य आहेत ही भावना नकळत मनाला स्पर्श करून गेली. शिवसेना पक्षाचा एक आमदार म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने एक राजकीय कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून माझी ही निरीक्षणे समोर ठेवत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुणवत्ता, एकनाथ शिंदे यांचे पराकोटीचे परिश्रम आणि स्व.अजित पवार यांच्यातील कठोर शिस्त हे गुण मला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून आले.
एका Numerologist नी त्यांचं आगामी भाकित बोलुन दाखवलं असेलही, पण त्याजोडीला कर्तृत्वाच्या कसोटीवरही डॉ. श्रीकांत शिंदे हे भविष्यात राज्याची धुरा वाहण्यासाठी परफेक्ट आहेत, ही भावना माझ्या मनात दृढ झाली आहे.
आमदार सुहास बाबर यांनी श्रीकांत शिंदे यांचे कर्तुत्व पाहून हे भाकीत वर्तवले असले तरी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे.
