खानापूर तालुक्यातील ३ सराईत गुन्हेगारांना अटक; ११ पिस्तूल, २२ काडतूस जप्त
: सांगली एलसीबीची धडक कारवाई
: खानापूर तालुक्यातील तीन आरोपी जेरबंद
: २२ जीवंत काडतूस, दोन मॅगझीन जप्त
: एकूण ७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
विटा, (प्रतिनिधी)
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीच्या पथकाने आटपाडी तालुक्यात तीन ठिकाणी छापे मारत खानापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगारांकडून ११ गावठी पिस्तुले, २२ जीवंत काडतूसे आणि दोन अतिरिक्त मॅगझिनसह एकूण ७ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी मयुरेश मनोहर आदाटे (वय २५ रा. मधुबन हॉटेलच्या पाठीमागे, विटा) याच्यासह मारुती अशोक गुजले (वय २४ रा. जांभूळमळा, ता. खानापूर) आणि वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे (वय २१ रा. ताडाचीवाडी ता. खानापूर) यांना जेरबंद केले आहे. तर मध्यप्रदेश मधील आरोपी पाजी हा फरार आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, खानापूर तालुक्यातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार मयुरेश आदाटे हा आटपाडी ते भिवघाट रस्त्यावर असलेल्या नेलकरंजी फाटा येथे कमरेला पिस्टल खोचून थांबलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नेलकरंजी फाटा येथे छापा टाकून आरोपी मयुरेश आदाटे याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आली. आदाटे यांने सदरची पिस्तूल मारुती गुजले रा. जांभूळमळा ता. खानापुर याच्याकडून खरसुंडी ते बलवडी रस्त्यावरील लाजरी पापड जवळ या ठिकाणाहून घेतल्याचे सांगितले. तसेच गुजले हा कामानिमित्त त्याच ठिकाणी थांबणार असल्याची माहिती देखील पोलिसांना दिली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तातडीने हालचाल करत खरसुंडी ते बलवडी रस्त्यावरुन दुसरा आरोपी मारुती गुजले याला ताब्यात घेतले. यावेळी पोलीसांनी गुजले याच्याकडून तीन पिस्तूल आणि सहा जीवंत काडतूस जप्त केली. जप्त केलेले पिस्तूल आणि काडतूस याबाबत माहिती विचारली असता आरोपी गुजले यांने सदरची पिस्तूल आणि काडतूस आपणास वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे यांने दिली असून तो आता आटपाडीच्या दिशेने गेल्याची माहिती दिली. तसेच त्याच्याजवळील काळ्या सॅक मध्ये आणखी काही पिस्तूल आणि काडतूस असल्याची माहिती दिली.
आदाटे आणि गुजले या दोन्ही आरोपींना जेरबंद केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने थेट
आटपाडी शहरात छापा टाकत धडक कारवाई केली. यावेळी पिस्तुले विक्री करणाऱ्या वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी वैभव इंगळे याच्याकडून सात पिस्तूल, चौदा जीवंत काडतूस आणि दोन स्पेअर मॅगझिन असा मोठा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला.
आरोपी वैभव उर्फ गब्बर इंगळे यांने सदरची सर्व पिस्तूल आणि काडतूस आपण मध्यप्रदेश येथील सैंधवा या भागातील पाजी ( पूर्ण नाव माहीत नाही) या आरोपीकडून खरेदी केली असल्याचे सांगितले. या तिन्ही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, अशी कारवाई यानंतर ही सुरू राहणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्पष्ट केले आहे.
————————————–
खानापूर तालुक्यातील
सर्वात मोठी कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केलेले तिन्ही आरोपी खानापूर तालुक्यातील आहेत. एकाचवेळी या सराईत गुन्हेगारांकडून ११ पिस्तूल आणि २२ काडतूस जप्त करण्यात आल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून तालुक्यात अवैध शस्त्र जप्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
——————————————
