कडेगावात देश विदेशातील लोक येणार, डॉ. विश्वजीत यांचे नियोजन

0
kadegaon_news_feature_200kb
Spread the love

: कडेगाव येथे २८ ऑक्टोबरपासून पहिली आंतरराष्ट्रीय परिषद

: ‘जागतिक अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन’ विषयावर देश-विदेशातील अभ्यासकांची उपस्थिती

कडेगाव, प्रतिनिधी : भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या अध्यक्षतेखाली कडेगाव येथे २८ व २९ ऑक्टोबर रोजी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या वतीने ‘जागतिक अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन : महाकाव्य, काव्य-वारसा आणि भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर ही परिषद होणार आहे.

परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. विश्वजित कदम राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पोलंडचे डॉ. फिलीप रुसिंस्की हे परदेशी अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे डॉ. बलराम शुक्ल बीजभाषण करणार आहेत.

यावेळी इन्फोसिस फेलो डॉ. सुचेता परांजपे, डॉ. माधवी कोल्हटकर, डॉ. प्रशांत धर्माधिकारी (गुजरात) तसेच डॉ. ए. राघव कृष्णा मोहन (हैद्राबाद) यांची प्रमुख व्याख्याने होणार आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मातृभाषा आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या अभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेला ऑफलाइन, ऑनलाइन व हायब्रिड पद्धतीने सहभागी होता येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सहभागींसाठी प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, २९ ऑक्टोबर रोजी औंध येथील जगप्रसिद्ध संग्रहालयाला भारतीय ज्ञान प्रणालीअंतर्गत अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. भाषा व साहित्याचे संशोधक विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापक तसेच भाषाप्रेमी नागरिकांना परिषदेत सहभागी होता येणार आहे.

परिषदेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून डॉ. महेश माळी, समन्वयक म्हणून डॉ. विशाल नाईक, कन्व्हेनर डॉ. मच्छिंद्र कुंभार, को-कन्व्हेनर डॉ. सविता माळी आणि मीडिया को-ऑर्डिनेटर म्हणून प्रा. नंदकुमार मोहिते काम पाहत आहेत. प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिषदेच्या आयोजनासाठी कार्यरत आहेत.

संपर्क :

प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे – 9850558404

प्रा. नंदकुमार मोहिते – 9421132161

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *