आ. सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; कार्यवाहीचा आदेश
: शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
विटा, प्रतिनिधी
खानापूर–आटपाडी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आ. सुहास बाबर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले. आ. बाबर यांच्या प्रयत्नांमुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून मतदारसंघातील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खानापूर–आटपाडी हा भाग कायम दुष्काळाच्या छायेत राहिला आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आ. बाबर यांनी सुरुवातीपासूनच पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले.
याच पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत टेंभू योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. खानापूर–आटपाडीतील सर्व लघु पाटबंधारे तलाव, बंधारे व जलसाठे टेंभूच्या पाण्याने भरून घेण्यात यावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती.
सध्या कृष्णा नदी खोऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पाण्यामुळे खानापूर व आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
“टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सर्व लघुपाटबंधारे तलाव जलसाठे भरून घेतल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. आ. सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टेंभू योजनेचे पाणी मिळाल्याने खानापूर आटपाडी तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.”
