विटा बायपास रोडला अखेर मुहुर्त ? पहा, केंद्रीय मंत्री गडकरी काय म्हणाले

0
file_0000000099f48207b96dc5d3b011acf9
Spread the love

विटा / प्रतिनिधी

विटा शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या विटा बायपास प्रकल्प बाबत आमदार सुहास बाबर यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विटा बायपासचा आराखडा दाखवून विषय प्राधान्याने मांडला. यावेळी ना. गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

भेटीदरम्यान आमदार बाबर यांनी विटा शहराची सद्यस्थिती सविस्तर मांडली. विटा हे सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती व्यापारी, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० (अहमदनगर–बारामती–फलटण–विटा–म्हैसाळ) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६E (गुहागर – कराड–विटा–नागज–विजापूर) हे दोन्ही महामार्ग विटा शहरातून जात असल्याने शहरात दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण निर्माण होतो.

अवजड वाहनांची वाढती वर्दळ, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि वाढणाऱ्या अपघातांच्या घटना यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भविष्यातील शहर विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी विटा शहराबाहेर स्वतंत्र बायपास करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार बाबर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी आमदार बाबर यांनी विटा बायपासबाबतचे सविस्तर आराखडा प्रस्ताव दाखवत निवेदन केंद्रीय मंत्री गडकरी यांना सादर केले. निवेदनाची दखल घेत गडकरी यांनी तातडीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विटा बायपास प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, आमदार बाबर यांनी गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई मधील विटा शहरातील गटार, रेणावी गाव व घाट, रेवणगाव घाट, सुलतानगादे, हिवरे व नागज घाट इ. उर्वरित प्रलंबित कामे तातडीने मंजूर करून पूर्ण करण्याची मागणीही केली. या अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत मंत्री महोदयांनी लवकर मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे निर्देश दिले. विशेषतः रेणावी घाट, रेवणगाव घाट, सुलतानगादे, हिवरे व नागज घाट परिसरातील रस्त्याचे काँक्रिट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *