कडेगावात विद्यार्थिंनीचे अनोख्या स्टाईलने स्वागत
नवागतांचे अनोखे स्वागत! कडेगावच्या मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयात ६०० विद्यार्थिनींना देववृक्षांची रोपे भेट
कडेगाव | प्रतिनिधी
भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथे इयत्ता अकरावीच्या नवागत विद्यार्थिनींचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. गुरुवारी (दि. २३ जुलै) आयोजित स्वागत समारंभात ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सुमारे ६०० विद्यार्थिनींना पिंपळ, वड, चिंच, शिसव आदी देववृक्षांची रोपे भेट देण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे म्हणाले, “भारती विद्यापीठात प्रवेश मिळणे ही मोठी संधी आहे. या संधीचे सोने करा. उत्तमतेचा ध्यास घ्या, वेळेचे महत्त्व ओळखा, स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे रहा आणि पुढील पाच वर्षांचे नियोजन आजपासूनच करा,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठ गीत, प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कु. विभावरी फिरमे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना देववृक्षांची रोपे वितरित करण्यात आली.
यावेळी कु. श्रेया मोरे, कु. मृणाल पाटील, कु. रेणुका माळी, कु. प्रांजल सावंत आणि कु. वैष्णवी हजारे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने प्रा. आय. एम. बिज्जरगी यांनी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. नंदकुमार मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. कदम यांनी, तर आभार प्रा. डी. टी. माने यांनी मानले.
