कुपवाड शहरात महिलेचा खून, पतीवर हातोड्याने हल्ला; सांगली जिल्हा हादरला
कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सकाळी सुमारे सहा वाजता घडली. या घटनेत महिलेच्या पतीवर हातोड्याने हल्ला करून त्याला देखील गंभीर जखमी करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मनिषा मोहन केसरेकर (वय ३५) असे आहे. तर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी फरिद अब्दुल शेख (वय ५२) याच्याविरुद्ध एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हंटल्यानुसार, शनिवारी सकाळी मनिषा केसरेकर यांच्या घराच्या मागील बाजूस आरोपी फरिद शेख याने कचरा टाकला. यावरून मनिषा यांनी आमच्या घराजवळ तुम्ही कचरा का टाकला ? असा जाब विचारला. यावेळी कचरा टाकण्याच्या विषयावरून मनिषा केसरेकर आणि आरोपी फरिद शेख यांच्यात जोरदार वाद सुरु झाला. मनिषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणून मोहन केसरेकर यांच्यावर हातोड्याने डोक्यात वार केले.
मोहन केसरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपींने मनिषा केसरेकर यांच्या पोटात आणि डोक्यात चाकूने तीन ते चार वार केले. या हल्ल्यात मनिषा केसरेकर या अत्यंत गंभीर जखमी झाल्या. मोहन आणि मनिषा केसरेकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे मनीषा केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुपवाड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आरोपी फरिद अब्दुल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
