‘देवभूमी जत’ नामकरणाचे गॅझेट लवकरच : पालकमंत्र्यांची घोषणा

0
file_00000000ed588211a13eb75f7a549e92
Spread the love

: जत शहरात कोट्यवधींच्या विकासकामांचा शुभारंभ
: आ. पडळकरांचे विरोधकांना श्वेतपत्रिकेचे खुले आव्हान

जत, (सोमनिंग कोळी)
जत तालुक्याच्या विकासासाठी आ. गोपीचंद पडळकर यांनी मागणी करायची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण ती पूर्ण करायची, असा अलिखित नियमच झाला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षात जतच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार पडळकर यांनी मांडलेली ‘देवभूमी जत’ ही संकल्पना चांगली असून, या नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल, अशी घोषणा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

जत नगरपालिकेच्या नूतन इमारतीसह शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत होते. नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, विक्रम ताड, चंद्रशेखर गोब्बी, आकाराम मासाळ, अण्णासाहेब गडदे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

जतच्या विकासाचा रोडमॅप तयार करा

   पालकमंत्री पाटील म्हणाले, जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने चांगला रोडमॅप तयार करावा. त्यासाठी एजन्सी नियुक्त करून तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करावा. टप्प्याटप्प्याने सर्व गावांचा चौफेर विकास करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल. तसेच जत तालुक्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणवाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलींच्या शिक्षणातील अडचणी शोधून त्यावर नवीन प्रयोग करता येतील का, याचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करताना आ. गोपीचंद पडळकर व अन्य मान्यवर.

जतच्या विकासाचा हिशेब द्या, श्वेतपत्रिका काढा : आ. गोपीचंद पडळकर

आ. गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, तुमच्या जन्मात जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास मी करून दाखवतो. तुमची श्वेतपत्रिका काढा आणि माझ्या दीड वर्षाच्या विकासकामांची श्वेतपत्रिका पाहा, असे खुले आव्हान त्यानी विरोधकांना दिले.

जतचा दुष्काळी तालुका अशी ओळख कायमची पुसून टाकायची असून, म्हैसाळ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. विस्तारित योजनेला आणखीन एक अतिरिक्त पाईपलाईन आपण जोडत आहोत. यासाठी नाबार्डकडून ९१९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच क्रीडा संकुलासाठी ७२ कोटी रुपयांचा आराखडा तयार असून त्यास मंजुरी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. दिवसा वीजपुरवठा करण्याच्या निर्णयामुळे रात्री वस्त्यांवर वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून, त्यासाठी २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. शहरासाठी आयुष्य कोटींची भुयार गटर मंजूर होत आहे. तर प्रत्येक गावात पाच ते सात कामे सुरू  असल्याचे पडळकर यांनी सांगितले. उमदी एमआयडीसीचा पाठपुरावा आपण सोडलेला नाही. केंद्र सरकारकडून येणाऱ्या दहा मोठ्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प जतला मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘दीड वर्षात अभूतपूर्व विकास’ : सदाभाऊ खोत

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, जत तालुक्यात गेल्या ५० वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास आ. गोपीचंद पडळकर यांनी अवघ्या दीड वर्षात करून दाखवला आहे. युती सरकारच्या काळात जतच्या निधीचा दुष्काळ संपला आहे. जतची ओळख केवळ दुष्काळी भूमी म्हणून न राहता ‘देवभूमी जत’ अशी व्हावी, ही संकल्पना पडळकर यांनी मांडली आहे.

   नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आमदार पडळकर यांनी दाखविलेली विकासाची स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरू लागली आहेत. पुढील पाच वर्षांत जत शहराचा मोठा कायापालट झालेला दिसेल.

कार्यक्रमास संजय तेली, दिग्विजय चव्हाण, सभापती अर्चना पाटील, अशोक बन्नेनवर, उपसभापती रविकुमार बगली, विजय रूपनर, विक्रम ताड, स्वप्नील शिंदे, इमरान गवंडी, काजल काळे, सुप्रिया बामणे, गौतम ऐवळे, भैय्या कुलकर्णी, फिरोज नदाफ, अण्णा भिसे, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

कोट्यवधींच्या विकासकामांचा शुभारंभ

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जत शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये १० कोटी रुपयांची जत नगरपरिषद नूतन इमारत, १५ कोटी रुपयांचे आरटीओ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, १ कोटी रुपयांचे नमो उद्यान व अभ्यासिका तसेच ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रारंभ अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *