स्व. अनिलभाऊंची स्वप्नपूर्ती होणार, ६१९ कोटीचा भरघोस निधी मंजूर
विटा, प्रतिनिधी
महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील ९ तलावांचा समावेश करण्यात आला असून, यासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असून, यामुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेला मोठा फायदा होणार आहे. तसेच टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक सहा व उर्वरीत कामांसाठी नाबार्ड मधून रुपये 619 कोटी रुपयास मान्यता मिळाली आहे. याबाबतही आमदार सुहास बाबर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे स्वप्न साकारत आहे. या दोन्ही निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील ९ तलावांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये अर्जुनवाडी तलाव रु. ५.१२ कोटी, आटपाडी तलाव रु. १८.३१ कोटी, बनपुरी तलाव रु. ४.०९ कोटी, शेटफळे तलाव रु. ३.२५ कोटी, विभूतवाडी तलाव रु. ३.०५ कोटी, आळसंद तलाव रु. ३.३३ कोटी, भांबर्डे तलाव रु. ३.३४ कोटी, पारे तलाव रु. ५.७३ कोटी, वेजेगाव तलाव रु. ५.७३ कोटी इ. तलावांचे समावेश करण्यात आला आहे. मतदारसंघातील उर्वरित सर्व तलावांचा सिंचन सुधार कार्यक्रम योजनेमध्ये समावेश करून संपूर्ण मतदारसंघ ओलिताखाली येईल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
सिंचन क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या निधीमधून तलावांखालील क्षेत्रातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तलावांचे व्हॉल्व्ह दुरुस्त करणे. जुन्या आणि नादुरुस्त कॅनालची (कालवे) दुरुस्ती करणे. नवीन पाईपलाईन टाकणे इ. कामे या आधुनिक पद्धतीने करून पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून, तलावांची पाणी साठवणूक आणि वितरण क्षमता वाढणार आहे. परिणामी, खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती क्षेत्राला याचा थेट फायदा होणार असून तलावांच्या खालील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल.
या महत्त्वाकांक्षी कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
अनिलभाऊंचे स्वप्न पुर्ण होणार :
टेंभू योजना ही स्वर्गिय आमदार अनिलभाऊंचे स्वप्न होते. ते पुर्ण करण्याचा शब्द आमदार सुहास बाबर यांनी निवडणुकी दरम्यान दिला होता. स्वर्गिय आमदार अनिलभाऊंच्या पश्चात आमदार सुहास बाबर यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक सहा व उर्वरीत कामांसाठी नाबार्ड मधून रुपये 619 कोटी रुपयास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मतदारसंघातील वंचित राहिलेल्या गावांना लवकरच पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टेंभू योजना पुर्णत्वास नेण्याचा व अनिलभाऊंचे स्वप्न पुर्ण करण्याचा शब्द खरा करून दाखविणारच अशी प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी दिली.
