उत्तमाचा ध्यास, क्षमतावृद्धी आणि अस्तित्वाची पुनर्व्याख्या गरजेची : डॉ. कुऱ्हेकर
कडेगाव, प्रतिनिधी : ‘ विद्यार्थ्यांनी उत्तमाचा ध्यास घेऊन, स्वतःच्या क्षमता वाढवून आपल्या अस्तित्वाची पुनर्व्याख्या करणे गरजेचे आहे’ असे प्रतिपादन भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथे आयोजित तीन दिवसीय ‘दीक्षारंभ :2026’ या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये डॉ. विकास कुऱ्हेकर आणि डॉ. जया कुऱ्हेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. विवेक रणखांबे हे होते.
पुढे बोलताना आपल्या व्याख्यानात डॉ. विकास कुऱ्हेकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून, जीवन समृद्ध करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वेळेचे प्रभावी नियोजन, वाचनाची सवय, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनमुक्त जीवन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या माध्यमातून यश संपादन करण्याचे आवाहन केले. “मोठी स्वप्ने पाहा, पण ती पूर्ण करण्यासाठी तितकीच मोठी मेहनत करण्याची तयारी ठेवा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
डॉ. जया कुऱ्हेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि संवाद कौशल्य यांचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, सकारात्मक विचार, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेची जाणीव जोपासण्याचे आवाहन केले. उच्च शिक्षणातील विविध संधी, संशोधनाची दिशा आणि करिअर नियोजनाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. विवेक रणखांबे यांनी सांगितले की, “भारती विद्यापीठाची शिक्षण परंपरा विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाही, तर त्यांच्यामध्ये नेतृत्व, चारित्र्य, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वतःचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित करावे.” असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंदा घाटगे यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. जॉय कुवर यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. रूपाली येवले आणि प्रा. वहिदा शेख यांनी केले.
