भारती विद्यापीठाच्या ‘मातोश्री बयाबाई कदम’ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विवेक रणखांबे
कडेगाव, (सचिन मोहिते) : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. विवेक रणखांबे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. भारती विद्यापीठाचे कार्यवाहक डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य या नात्याने ‘एनईपी’चे आव्हान पेलीत, कडेगांव-पलूस परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची एक संधी म्हणून मी या सेवा-काळाकडे पहातो आहे, अशी भावना त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
डॉ. रणखांबे विद्यार्थीदशेत शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कला “महालक्ष्मी पुरस्काराचे’ मानकरी होत, तसेच एन.एस.एस. च्या माध्यमातून, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिल्ली येथील प्रजासत्ताक-दिन संचलनात सहभागी होण्याचा मान मिळविणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे पहिले स्वयंसेवक आणि राज्यातील शेकडो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचे विजेते आहेत. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. न्यू कॉलेज, कोल्हापूर येथून बी. ए., शिवाजी विद्यापीठातून एम. ए., (वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथून) एम. फिल व पीएच. डी. प्राप्त करीत उच्च शिक्षण क्षेत्रातील सुमारे ३४ वर्षांचा प्रदीर्घ असा ३४ वर्षांचा अध्ययन, अध्यापन, संशोधनाचा आणि प्रशासकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. इंग्रजी विषयाचे अभ्यासकअसणाऱ्या डॉ. रणखांबे यांनी एम. फील आणि पीएच. डी. सह एलएल. बी (विधीविद्या) आणि नारदीय तसेच वारकरी कीर्तन या विषयांतील पदव्या आणि पदविका धारण केल्या आहेत.
” अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांत आयोजित विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधनपर निबंध सादर केले आहेत. भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे तसेच महाराष्ट्रातील इतर विद्यापीठे आणि संस्था यांच्या वतीने राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या “जीवन साधना गौरव पुरस्कार आणि डी. लिट पदवी मानपत्रांचे लेखक, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे प्रदीर्घ निकटचे सानिध्य लाभलेले डॉ. रणखांबे यांचे मूळ गांव हे पुणदी, ता. पलूस असून यापूर्वी त्यांनी संस्थेच्या पुणे येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयाचे आणि सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्यपद यशस्वीपणे भूषविले आहे. नॅक या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या स्थापनेपासून केल्या गेलेल्या चारही सायकल्स (आवर्तनांत) त्यांनी समन्वयक आणि प्राचार्य म्हणून योगदान देत, डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये भारती विद्यापीठाचे नांव नोंदविणाऱ्या संकल्पांचे संयोजक, शिस्तप्रिय, नवोपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य, संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब आणि कदम कुटुंबियांच्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संकल्पांत, अग्रभागी असणारे एक प्रभावी वक्ते म्हणून डॉ. रणखांबे यांचा या परिसराला परिचय आहे.”
डॉ. रणखांबे यांचे मान्यताप्राप्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये सुमारे तीसहून अधिक रिसर्च पेपर्स प्रकाशित झाले आहेत आणि ‘रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा भारतीय इंग्रजी साहित्यावरील प्रभाव,’ या यूजीसी अनुदानित मेजर रिसर्च प्रोजेक्टचे मुख्य संशोधक-समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर तीन विद्यार्थ्यांनी एम. फील तर पांच विद्यार्थ्यांनी पीएच. डी. या पदव्या संपादन केल्या आहेत.
भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे यांच्या कला, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे अधिष्ठाता या नात्याने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक आवर्तनांचा प्रत्यक्ष अनुभव, कडक शिस्त आणि कठोर प्रशासनासाठी प्रसिद्ध, गतिमान बदलांचे भान असलेले प्राचार्य, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाण असलेले प्राध्यापक, स्टेट युनिव्हर्सिटी आणि डिम्ड विद्यापीठ कार्यप्रणालीचा प्रदीर्घअनुभव असणारे माजी अधिष्ठाता, पलूस-कडेगांवचे भूमिपुत्र म्हणून परिचित असलेले ‘एक शिस्तप्रिय प्राचार्य’ लाभल्याने स्टाफ आणि विद्यार्थी वर्गात चैतन्यांची आणि एका नवीन पर्वाच्या प्रारंभापोटी समाधानाची भावना व्यक्त होते आहे.
मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी रुजू होण्याआधी त्यांनी माजी आमदार श्री. मोहनशेठ कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्राध्यापक (डॉ) शिवाजीराव कदम यांचे आशिर्वाद घेतले. संस्थेच्या वतीने सहकार्यवाह प्राचार्य डॉ. के. डी. जाधव यांच्या उपस्थितीत त्यांनी डॉ. डी. जी. कणसे यांच्या कडून प्राचार्यपदाची सूत्रे स्वीकारली.
