खानापूर तालुक्यात राष्ट्रवादी आक्रमक; न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी


विटा (प्रतिनिधी) :  मालवण येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशानमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटी स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त करण्यात आले होते. राजकीय फायद्यासाठी पुतळ्याचे अनावरण लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या हेतूमुळे पुतळा उभारण्यात अत्यंत घाईगडबड केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याची जनभावना तयार झालेली आहे. राज्यात कोठेही महापुरुषांचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचनालयाची परवानगी घेण्यासाठी पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला कला संचनालयाने मान्यता दिलेली असताना या ठिकाणी ३५ फुटांचा पुतळा उभारण्यात आला. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरुषाचा पुतळा उभा करीत असताना शासकीय यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराजांचा पुतळा एक वर्षही पुर्ण न होता अवघ्या ८ महिन्यात सोमवारी २६ ऑगस्ट रोजी कोसळला. यावरून पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड होत आहे.

छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारणारा ठाण्यातील कल्याण येथील २५ वर्षाचा शिल्पकार जयदीप आपटे याला पुतळा उभारण्याचा जास्त अनुभव नसतांना देखील मुख्यमंत्रांच्या चिरंजीवांच्या मैत्री व आर्थिक फायद्यासाठी राजकोट तटावर ३५ फूटी महाराजांच्या पुतळा उभारण्याचे काम दिले होते. जयदीप आपटेला फक्त दोन फुटांपर्यत पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. अशा जयदीप आपटेला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचे कंत्राट का देण्यात आले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्यातील महायुतीचे सरकार या दुर्दैवी घटनेची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

सरकार मधील जेष्ठ नेते नारायण राणे हे आंदोलनकर्त्यांना एकेकाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर घटनेचा निषेध करून दोषींवर कारवाई करण्याऐवजी जबाबदारी नौदलावर ढकलून दोषींना पाठीशी घालत आहेत. ही सरकार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची कृती निषेधार्य आहे.त्यांचा आम्ही निषेध करतो.

यावेळी ॲड. बाबासाहेब मुळीक, किसनराव जानकर, हरी माने, ॲड. संदीप मुळीक, सौ.प्रतिभा काटकर, सौ.अमृता कुपाडे, भूमी कदम, सौ.सोनाली भगत, सुरेखा शिंदे, सुनिता जाधव, शोभा कदम, महेश फडतरे, मनोहर चव्हाण, अजित जाधव, श्रेयस पाटील, महेश कुपाडे, सतीश बाबर, प्रल्हाद शिंदे, गणेश कदम, राजकुमार गायकवाड, सचिन मेटकरी, शाहरुख पठाण, शिवाजी गुजर, सुभाष मुळीक, संभाजी मोरे, वृषकेत देशमुख, विक्रम चोथे, सचिन शिरतोडे, धनंजय टेके, श्रीकांत जंगम, यतिराज गुजले, विलास शिंगाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *