सोनहिराचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना मिळाला सर्वोत्तम सन्मान
कडेगांव (प्रतिनिधी) : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. शरद कदम यांना द शुगर टेक्नोलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया यांचा लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार साखर कारखान्यामध्ये आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जातो.
द शुगर टेक्नोलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया हि संस्था १९२५ पासून साखर उद्योगात कार्यरत आहे. या पुरस्काराचे वितरण संस्थेच्या ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी शामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम गोवा येथे होणार आहे.
श्री. शरद कदम यांना यापूर्वी वैयक्तिक राज्य पातळीवरील भारतीय शुगर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांचा बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर तसेच व्यंकटेश्वरा प्रकाशन यांचेकडून सक्षम अधिकारी हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते गेले २५ वर्षे सोनहिरा कारखान्यात कार्यकारी संचालक या पदावर काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी आंबाजोगाई साखर कारखान्यात मॅन्यू केमिस्ट म्हणून ५ वर्षे , त्यांनी डे. चिफ केमिस्ट म्हणून तासगाव सह. साखर कारखान्यात ५ वर्षे व विश्वास सह. साखर कारखाना चिखली येथे ७ वर्षे काम केले आहे. त्यांनी आजपर्यंत साखर उद्योगात केलेल्या कामाची दखल घेवून द शुगर टेक्नोलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया यांनी त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या कार्यकालामध्ये सोनहिरा साखर कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील २६ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
