विट्यात भीषण अपघातात तरुण ठार; विटा कुंडल रस्त्यावर दुर्घटना

विटा (प्रतिनिधी) : येथील विटा – कुंडल रस्त्यावरील चक्रधारी सोसायटी जवळ दुचाकीच्या भीषण अपघातात महेंद्र पांडुरंग शितोळे (वय ३५ रा. शिवाजीनगर,  विटा ) हा तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना सोमवार सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत तरुणाच्या कुटुंबास आधार दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, विट्यातील महेंद्र शितोळे हा तरुण आंधळी येथे असणाऱ्या आपल्या सासरवाडीला गेला होता. आज सोमवारी सकाळी हा तरुण आंधळीहून विट्याकडे येत असताना खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर तरुणाच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. टायर पंक्चर असल्याने रस्त्यात उभा असलेल्या डंपरला लागूनच हा अपघात झाल्यामुळे अपघाताबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यानुसार सदर दुचाकीस्वार रस्त्यात उभा असलेल्या डंपरला धडक देऊन रस्त्यात पडला की या डंपरला चुकवण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार रस्त्यात पडून ठार झाला? अशी शक्यता घटनास्थळावरून वर्तवण्यात येत आहे.

युवानेते वैभव पाटील मदतीला …

अपघाताची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तातडीने या अपघातग्रस्ताची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा, तरुण जागीच ठार असल्याने वैभव पाटील यांनी तातडीने प्रशासनासह रुग्णवाहिकेला आणि मृत तरुणाच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. यावेळी घटनास्थळावर दाखल झालेल्या महेंद्र शितोळे यांच्या नातेवाईकांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. यावेळी वैभव पाटील यांनी नातेवाईकांना धीर देत पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. हा  अपघात नेमका कसा झाला ? नक्की चूक कोणाची ? याबाबत पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. अपघातानंतर महेंद्र शितोळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महेंद्र शितोळे यांच्या मृत्यूनंतर विटा परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *