राष्ट्रीय महामार्ग विभागाचा कंत्राटदाराला आदेश;  गजानन सुतार यांचे मोठे यश

0
file_00000000ad6c8211affdc9c070e14afa
Spread the love

विटा, प्रतिनिधी : विटा शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप ते बळवंत कॉलेज या राष्ट्रीय महामार्गावरील रोड मार्किंग (रस्त्यावरील पांढरे पट्टे) पूर्णपणे फिकट झाल्याने वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात रस्त्यावरील लेन स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला होता.

या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब हुलगे यांनी काँग्रेसचे नेते गजानन सुतार यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेत गजानन सुतार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग,कोल्हापूर यांच्याकडे  लेखी तक्रार दाखल करून सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कंत्राटदार संस्थेला १५ दिवसांच्या आत रोड मार्किंगचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार विटा शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप ते बळवंत कॉलेज या मार्गावरील रोड मार्किंगच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या कामामुळे वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असून रस्ता सुरक्षेलाही मोठे बळ मिळणार आहे.

नागरिकांच्या समस्यांची प्रभावीपणे शासन स्तरावर मांडणी करून सातत्याने पाठपुरावा केल्यास विकासकामांना गती मिळते, याचा प्रत्यय या कामातून आला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच संबंधित विभागाने उर्वरित कामही उच्च दर्जाचे व निर्धारित मुदतीत पूर्ण करावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *