सांगलीत जलतरणपटूवर मगरीचा थरारक हल्ला; पण तो लढला…

0
271422_C_adbanao
Spread the love

सांगलीत कृष्णा नदीत पोहत असताना मगरीचा हल्ला; जलतरणपटू नाना साळुंखे जखमी

सांगली, प्रतिनिधी
सांगली शहरातील स्वामी समर्थ घाटावर आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत पोहत असताना नाना साळुंखे (वय ५०) यांच्यावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सांगलीवाडीच्या बाजूला पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या झाडांचे ओंडके नदीकाठी रुतून बसले आहेत. याच परिसरात मगरिचा वावर असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाना साळुंखे रा. माधवनगर डेअरी व्यवसायिक असून ते कृष्णामाई जलतरण ग्रुप, सांगलीचे सक्रिय सदस्य असून ते नियमितपणे कृष्णा नदीत पोहण्यासाठी जातात. सकाळी पोहताना नदी पात्रात पाण्यात वाहून आलेले लाकडी ओंडके व मगर यातील साम्य लक्षात न आल्याने ते पोहत असताना त्यांच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीच्या जबड्यात त्यांचा डावा खांदा सापडल्याने त्यांना डाव्या छातीवर, डाव्या खांद्यावर व डाव्या हातांच्या पंज्यावर मगरीचे दात रुतून मोठी जखम झाली आहे. त्यांनी प्रसंगावधान दाखवून पोहताना जोरात हिसडा मारल्याने मगरीच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश आले, त्यामुळेच पुढील अनर्थ टळला आहे.

घटनेनंतर नदीकाठ परिसरात एकच खळबळ उडाली असून नियमित पोहायला जाणारे जलतरण मंडळे, जलतरण पटू व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *