file_00000000ff987230b63f8134d9cacd89
Spread the love

‘शिवप्रताप’ एक हजार कोटींचा टप्पा पार करणार; चेअरमन शेखर साळुंखे

शिवप्रताप मल्टीस्टेटची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न

विटा |
सभासदांचा अढळ विश्वास, पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विटा ही राज्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून वेगाने वाटचाल करत असून, लवकरच १,००० कोटी रुपयाच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पार करणार आहे. राज्यातील प्रत्येक  पतसंस्थेसाठी आदर्श ठरेल अशी “रोल मॉडेल” संस्था उभारण्याचा आमचा दृढ संकल्प असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन शेखर साळुंखे यांनी केले.

ते शिवप्रताप मल्टीस्टेटच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

चेअरमन शेखर साळुंखे म्हणाले, “उच्चतम बँकिंग सेवा हीच खरी सभासद सेवा” ही संस्थापक स्व. प्रतापशेठ साळुंखे यांची शिकवण आम्ही जपली आहे. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत संस्था आज सर्वोत्तम, विश्वासार्ह आणि पारदर्शक बँकिंग सेवा देत आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत, जागतिक बाजारातील चढ-उतार आणि विविध आव्हानांवर यशस्वीपणे मात करत संस्थेने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, एकूण ठेवींमध्ये २१.५८ टक्के वाढ होऊन ठेवी ५२७ कोटींवर पोहोचल्या आहेत. कर्ज व्यवसाय ४०० कोटी, गुंतवणूक १४० कोटी, ढोबळ नफा १०.४१ कोटी इतका असून संस्थेचा एन.पी.ए. शून्य टक्के आहे. संस्थेला ‘अ’ वर्गाचे लेखापरीक्षण  प्राप्त झाले असून सर्व सभासदांना ११ टक्के लाभांश  जाहीर करण्यात आला आहे. ही आर्थिक मजबुती सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे सक्षम नेतृत्व आणि कर्मचारी वर्गाच्या समर्पित सेवेमुळेच शक्य झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यकारी संचालक ॲड. विठ्ठलराव साळुंखे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना सांगितले की, बँकिंग क्षेत्र झपाट्याने बदलत असून ग्राहकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. पारंपरिक बँकिंगच्या पलीकडे जाऊन डिजिटल बँकिंगला प्राधान्य देत शिवप्रताप मल्टीस्टेटने अत्याधुनिक मोबाईल बँकिंग ॲप, व्यवसायिकांसाठी UPI QR Code, डिजिटल व्यवहार सुविधा आणि विविध आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यातही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभासदांना अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हाईस चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांचे स्वप्न केवळ मोठी संस्था उभारण्याचे नव्हते, तर संपूर्ण देशात नावाजलेली, सभासदांचा विश्वास संपादन करणारी आणि सहकार क्षेत्राला दिशा देणारी संस्था उभी करण्याचे होते. आज त्या स्वप्नपूर्तीकडे संस्था यशस्वीपणे वाटचाल करत असून प्रत्येक सभासद हा या यशाचा खरा भागीदार आहे.

सभासद दिलीप सव्वाशे, शिवाजी पवार, रामचंद्र गुरव, डॉ. कुमुदिनी नष्टे, लक्ष्मण कोरे आणि उत्तम घाडगे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी संचालक सीताराम हारुगडे, गोपाळ तारळेकर, प्रवीण पवार, गणेश अदाटे, संचालिका सुरेखा जाधव, रोहिणी जाधव, बँकिंग सल्लागार अशोक नाईक यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  गणेश बाबर यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी केले, तर आभार हणमंत पाटील यांनी मानले. संपूर्ण वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *