चिंचणी ग्रामपंचायत समोर १५ ऑगस्ट पासून आमरण उपोषण
: चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषणाचा खणखणीत इशारा
: १४ ऑगस्टपर्यंत कामाबाबत ठोस निर्णय न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपोषण
कडेगाव, (प्रतिनिधी) : कडेगाव तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे तालुक्यातील चिंचणी (वांगी) गावातील मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणीची मागणी करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना अविनाश अरविंद माने ,कुलदीप सर्जेराव औताडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे. निवेदनाद्वारे दिलेल्या मागणीची दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून चिंचणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चिंचणी (वांगी) हे कडेगाव तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, कॉलेज , शासकीय वसतिगृह, विविध बँका, तहसील कार्यालय तसेच व्यापारी आस्थापनांकडे जाण्यासाठी या मुख्य रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने पादचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी तसेच इतर वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढला असून धुळीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वीही ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत रस्त्याच्या कामाबाबत प्रशासकीय मंजुरीसह ठोस लेखी निर्णय देण्यात यावा, अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
