विट्याच्या राजाला येणार भक्तांच्या गर्दीचा ‘ महासागर ‘ ; जय्यत तयारी
विटा | प्रतिनिधी
विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत महात्मा गांधी विद्यामंदिर पटांगण, साळशिंगे रोड, विटा येथे महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी दिली. त्यामुळे 23 सप्टेंबर रोजी विट्याच्या राजाच्या प्रांगणात भक्तांच्या गर्दीचा महासागर येणार असल्याचे बोलले जात आहे.

नवसाला पावणारा गणपती म्हणून विट्याच्या राजाची ओळख असून, विटा परिसरातील भाविकांची त्याच्यावर मोठी श्रद्धा आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक उपक्रमांसोबतच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा मंडळाचे सोळावे वर्ष असून, मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर, अध्यक्ष अमोल बाबर आणि उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे ते केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती. मंदिराची हुबेहूब रचना, आकर्षक विद्युत रोषणाई आणि कलात्मक सजावटीमुळे विट्यातच केदारनाथ धामचा अनुभव भाविकांना घेता येत आहे. विट्याच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हा देखावा आकर्षण ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हळदी-कुंकू समारंभात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
“विट्याचा राजा मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जोपासणारे विविध उपक्रम राबविले जातात. बुधवारी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.”
अमोलदादा बाबर, अध्यक्ष, विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
