सांगली (प्रतिनिधी) : सांगलीतील नशा आणि जुगाराचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी योगींच्या बुलडोझर पॅटर्नची गरज आहे. त्यामुळे आम्ही नऊ ऑगस्ट पासून सांगलीत क्रांती चळवळ सुरू करून अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त करू, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज दिली.
याबाबत माहिती देताना पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगली मिरज कुपवाड शहर आणि परिसरातील तरुणांना नशा आणि जुगाराच्या आहारी नेणार्या मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत . त्या विरोधात आम्ही या आधीही पोलिसांना अनेक पुरावे दिले आणि त्यावेळी कारवाई देखील झाली. मात्र पुन्हा एकदा या अवैध धंद्यांनी देशाची भावी पिढी बरबाद करणारी मुळे पसरायला सुरुवात केली आहे. या नशा आणि जुगाराच्या विरोधात आम्ही आता सशक्त युवा क्रांती चळवळ उभी करत आहोत.
ते म्हणाले, तंबाखू मिळावी इतक्या सहजपणे सांगली मिरजमध्ये गांजा मिळत आहे. नशेच्या गोळ्या अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात.
अनेक होतकरू तरुण नशा आणि जुगाराच्या आहारी गेले आहेत. कित्येक पालकांनी माझ्याकडे येऊन याबाबत माहिती दिली. शहरातील मानसोपचार तज्ज्ञांसह मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात गेल्यानंतर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. जुगारात तरुणांनी हजारो रुपये गमावलेले आहेत. त्यासाठी ते चोरीच्या वाटमारीच्या सोन साखळी चोरीच्या मार्गाला लागत आहेत. चेन स्नॅचिंग व गंभीर गुन्हेगारी वाढण्याच्या मुळाशी नशा आणि जुगारच आहे. या विरोधात पोलिसांकडून आक्रमक कारवाईची अपेक्षा आहे.
रोज गांजा पकडला जातो रोज जुगार मटका अड्डा वर कारवाई होते, रोज अल्पवयीन गुन्हेगार सापडतात, कारवाई हि होते, पण ह्या घटना काही केल्या थांबेनात. या विरोधात आता योगींचा बुलडोझर पॅटर्नची गरज आहे. पुण्यात व मुंबईत गुन्हेगार व अवैद्य धंद्यांवर बुलडोझर चालवले आता सांगलीतही चालवुन यांची मुळे उखडून टाकली पाहीजेत.
या चळवळीची सुरुवात आम्ही मंगळवारी पोलीस अधीक्षकांना भेटून याबाबतचे निवेदन देऊन करत आहोत. 9 ऑगस्ट ला क्रांती दिनी शहरात जागोजागी जागृती व सह्यांची मोहीम घेऊन आम्ही पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांना जनतेच्या मनातील या विषयाचा संताप पोहोच करू. त्यानंतर ही कारवाई झाली नाही तर राजमाता अहिल्यादेवी जयंती दिनापासून आक्रमक पद्धतीने आंदोलन उभे करावे लागेल. त्यात सामान्य माणूस सहभागी असेल.” अशी माहिती पृथ्वीराज पवार यांनी दिली.
ही चळवळ केवळ या अवैद्य धंद्यांवर कारवाई करावी एवढ्या पुरती मर्यादित नाही. यामध्ये तरुणांचे प्रबोधन देखील महत्त्वाचे आहे. पालक आणि मुले यांच्याशी संयुक्तपणे संवाद कार्यक्रम घेतले जातील. समाज माध्यमातून एक प्रभावी चळवळ उभी करू. रिल्स स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आदी उपक्रम देखील होतील. सोबतीला नशापुरीची केंद्रे उध्वस्त करण्याची देखील मोहीम आम्हाला राबवावी लागेल. त्यासाठी आधी आम्ही पोलिसांना वेळ देऊ त्यांनी वेळेत काही केले नाही तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. ही मोहीम महिला हाती घेतील आणि त्याच आक्रमकपणे राबवतील.”