वाळवा ( रहीम पठाण ) : इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय महाडिक यांनी गेली सलग २२ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.त्यामुळे सध्या इस्लामपुरात चर्चा सुरू आहे ती फक्त या विक्रमी रक्तदान शिबिराचीच.
याबाबत अधिक माहिती अशी, आज विजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त सलग बाविसाव्या वर्षी रक्तदान शिबिर पार पडले. अनेक ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने रक्तदान करणारे आपण पाहतो. पण स्वतः रक्तदान करीत इतरांना हि यासाठी सजग करणारे आणि तेही गेली सलग 22 वर्ष. निश्चितच हे काम कठीण वाटते. मात्र इस्लामपूर येथील विजय महाडीक यांची मुळातच समाज सेवा ही रक्तात आहे . वडिल माजी सैनिक कै. तुकाराम महाडिक हे देश सेवेत होते. त्यांचे संस्कार व देश सेवेची भावना विजय महाडीक यांच्या मनात खोलवर रूजली आहे. म्हणूनच गेली 22 वर्षे ते आपल्या वाढदिवसादिवशी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान घेतातच त्याला त्यांच्या जवळच्या लोकांची ही मोठी साथ असते.
आज समाजात रक्तदान शिबीरे अनेक ठिकाणी घेतली जातात. यामध्ये अनेक सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक, यांचा समावेश होतो. पण सातत्याने 22 वर्षे रक्तदान शिबिर घेणारे लोक अगदी बोटावर मोजण्या इतके लोक सापडतील आणि त्यात सर्वसामान्य घरातील एखादी व्यक्ती रक्तदान शिबीरे आयोजित करते व सातत्याने 22 वर्षे ती चालवते हे अगदी दुर्मिळच पहावयास मिळेल.
विजय महाडीक यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे शेकडो लोकांची रक्ताची गरज सहज पूर्ण होते व त्यांचे समाधान विजय महाडीक यांच्या चेहऱ्यावर दिसते त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघ पुरस्कृत महावार्ता न्यूज यांचा 2013 चा युवा रत्न पुरस्कार मिळाला अशी सामाजिक बांधिलकी जपणाय्रा संस्था, राजकीय क्षेत्रातील लोक, यांना हा एक आदर्श ठरेल…
स्वयंप्रेरणेने रक्तदान
: 1 सप्टेबर हा दिवस उजाडला की विजय महाडीक यांच्या जवळचे लोक न विसरता रक्तदान करतात यामध्ये सर्व सामान्य मित्र परीवार डॉक्टर, शिक्षक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोक यांचा समावेश असतो.
लोक स्वयंप्रेरणेने येऊन या ठिकाणी रक्तदान करतात, हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.