सांगली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पात्र महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खानापूर-आटपाडी विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी केले आहे.
बाबर म्हणाले, गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या आढावा बैठकीत खानापूर मतदार संघातील एकूण ४३,२१२ अर्ज मंजूर मंजूर झाले होते. सदर बैठकीमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अनुषंगाने पोर्टल वर छाननी अंती पात्र ठरलेल्या खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील महिलांना योजनेचा लाभ देण्यास अंतिम मान्यता देऊन शासनास शिफारस करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये खानापूर तालुक्यातील एकूण २३,८६८ व आटपाडी तालुक्यातील एकूण १९,३४४ अर्जांना छाननी अंतीम मंजुरी देण्यात आली. यामधील तात्पुरते नामंजूर झालेले ३,६७० अर्ज असून त्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करावी असे आवाहन केले होते. त्यानुसार त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केली आहे, शिवाय नव्यानेही अर्ज केले आहेत. आता लाभार्थींसाठी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. तरी माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा.
सर्व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे. मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व खातेप्रमुख, अंगणवाडी सेविका, सेतू व महा-ईसेवा यांनी घ्यावी. तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी आर्थिक मागणी करू नये. अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशाही सूचना अध्यक्ष अमोल बाबर यांनी केल्या.
महिला वर्गातून समाधान :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत खानापूर तालुक्यात ज्या – ज्या पात्र लाभार्थीनी अर्ज केले होते. त्यातील अनेकांच्या खात्यावर प्रत्यक्षात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाचे जाहीर आभार मानत असल्याचे अमोल बाबर यांनी सांगितले.