विटा (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिवसेना नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बुधवारी दि. ४ रोजी खानापूर विधानसभा मतदारसंघात दौरा होत आहे. या दौऱ्यात खा. शिंदे यांचे विटा व आटपाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यात खा. शिंदे यांच्या समवेत उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, व माजी खासदार शिवसेना नेते राहुल शेवाळे हे देखील सहभागी होणार आहेत.
स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास बाबर हे महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वर्गीय आमदार बाबर यांच्या निधनानंतर प्रथमच शिवसेना नेत्यांचा या मतदारसंघात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौरा होत आहे. या दौऱ्यात खासदार शिंदे हे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहेत. विटा येथे दुपारी ३वाजता विटा – सांगली रस्त्यावरील सुरभी लॉन येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक खासदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीनंतर सायंकाळी ६ वाजता आटपाडी येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमास खासदार शिंदे मंत्री सामंत व माजी खासदार शेवाळे उपस्थित राहणार आहेत.
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे.दस्तूर खुद्द स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मतदार संघासाठी सर्वाधिक वेळ दिला आहे. सुहासभैया बाबर यांच्यासाठी खासदार शिंदे हे स्वतः या निमित्ताने पदाधिकाऱ्यांशी बोलून व्ह्यूवरचना आखत आहेत. त्यामुळे या हक्काच्या मतदारसंघावर शिंदे गटाने अधिकचे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सर्वात अग्रेसर भूमिका स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांची होती. मुख्यमंत्री शिंदे व स्वर्गीय आमदार बाबर यांचे अत्यंत निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. आमदार बाबर हयात असताना मुख्यमंत्र्यांनी या विधानसभा मतदारसंघासाठी प्रचंड निधी दिला होता. तर त्यांच्या पश्चात त्यांची सुपुत्र युवक नेते सुहास बाबर व अमोल बाबर यांच्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांची विशेष मर्जी राहिली आहे. त्यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात बाबर यांच्या सुपुत्रांना मदत करण्याची भूमिका ठेवली आहे. तर बाबर यांच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी तोच जिव्हाळा कायम ठेवला आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी ही सुहास बाबर यांचे काम अधिकाधिक सुकर व्हावे या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची महत्वपूर्ण टीम या निमित्ताने मतदारसंघात येत आहे