विटा ( प्रतिनिधी ) : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा उद्या मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विटा येथे होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित राहणार आहेत. शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी केले आहे.
अमोल बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश निघाला आहे. त्यामुळे आता खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरीत 54 गावांना टेंभूचे पाणी मिळणार आहे. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रेवानगर विटा येथे होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता महात्मा गांधी विद्यामंदिर विटा च्या मैदानावर शेतकरी मेळावा होणार आहे.
बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत प्रयत्न केले. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्कऑर्डर निघाली आहे. सहाव्या टप्प्यात सहा अ एक, सहा अ दोन आणि सहा ब अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. या माध्यमातून खानापूर तालुक्यातील 28, आटपाडी तालुक्यातील 14 आणि तासगांव तालुक्यातील 12 गावांना पाणी मिळणार आहे. जवळपास 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गावांना मिळणारे पाणी मिळणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.
काही गावांना पूर्वी टेंभूचे पाणी मिळत होते. मात्र केवळ फार कमी क्षेत्र ओलिताखाली येत होते. त्या गावातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न सहाव्या टप्प्यातील नवीन योजनेत करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील पळशी गावातील तलावातून पळशी उपसासिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. पळशी तलाव टप्पा क्रमांक पाचच्या गोरेवाडी कालव्यातून स्वतंत्र फिडरने भरला जाणार आहे. मतदारसंघातील साधारण 54 गावांना लाभ मिळणार आहे.
या मेळाव्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अमोल बाबर यांनी दिली आहे.
खानापूर तालुक्यातील
या गावाचा समावेश…
खानापूर तालुक्यातील विटा, सुळेवाडी, गुंफा, गार्डी, भांबर्डे, वासंबे, घाडगेवाडी, कुर्ली, पारे, बामणी, चिंचणी, रेणावी, रेवणगाव, धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखिनवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी (खा), खानापूर, पोसेवाडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, भडकेवाडी, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे या गावांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी, गुळेवाडी, पिंपरी बुद्रुक, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, खांजोडवाडी राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, घरनिकी, कुरुंदवाडी तर तासगांव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे (दत्तनगर) या गावांचा समावेश आहे.