विटा ( प्रतिनिधी ) : ” स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खानापूर मतदार संघात असलेला हजारो वर्षांचा दुष्काळ टेंभू योजनेच्या पाण्याने धुवून काढण्याचे काम केले आहे. आता चर्चा होते त्यांचे स्मारक कसे असावे ? मला विचाराल तर मी म्हणेन त्यांचे स्मारक आभाळा एवढ्या उंचीचे असावे. आभाळा एवढ्या उंचीचे म्हणजेच त्यांची टेंभू योजना. ज्या टेंभू योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या कपाळावरील दुष्काळाचा कलंक पुसला ती टेंभू योजनाच आमदार अनिलभाऊ बाबर यांचे खरेखुरे स्मारक आहे, असे सांगत कु. निकिता संजय कदम ही शेतकऱ्याची मुलगी भावुक झाली.
टेंभू योजनेचे पाणी आल्यानंतर विटा शहरातील सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात काय बदल झाला ? या विषयावर घुमटमाळ येथील वसंत भानुदास कदम यांचे सुपुत्र असलेल्या रणजीत कदम आणि संजय कदम तसेच प्रगतिशील शेतकरी मारुती कदम यांनी दैनिक महासत्ताशी संवाद साधला.
यावेळी बोलताना रणजीत कदम म्हणाले, घुमटमाळ परिसरात आमची आठ एकर शेती आहे. परंतु टेंभूचे पाणी येण्यापूर्वी म्हणजेच गेल्या सात वर्षांपूर्वी अत्यंत बिकट परिस्थिती होती. द्राक्ष बाग लावण्याचा प्रयत्न केला तर टँकर ने पाणी घालायला लागायचे. वर्षभर शेतात राबून देखील जे दोन तीन लाख हाती यायचे ते खर्चावर पुन्हा निघून जायचे. त्यामुळे वर्षाअखेर शेतीतून गोळा बेरीज ही शून्यचा असायची. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचे पाणी विटा शहरात दाखल झालं आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात खऱ्यखुऱ्या अर्थक्रांतीला सुरुवात झाली आहे.
कदम म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी मिळत असल्याने आता बारमाही बागायत शेती सुरू झाली आहे. सिमला मिरची, कारली, टोमॅटो, दोडका अशी भाजीपाल्याचे पीक आम्ही घेतो. पहिल्यांदा शेती करून हातात रुपया शिल्लक राहत नव्हता. आता अवघ्या सातच वर्षात पूर्ण चित्र पालटल आहे. वर्षाला आता आमच्या कुटुंबाला शेती मधून 50 लाखाहून अधिकचे उत्पन्न मिळत आहे. ही फक्त आणि फक्त टेंभू योजना आणि स्वर्गीय अनिलभाऊ यांचीच कृपा असल्याचेमत रणजीत कदम आणि संजय कदम या बंधूनी व्यक्त केले.
टेंभू योजनेचे पाणी आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. ज्या कदम बंधूंना शेतीतून एक रुपया शिल्लक राहत नव्हता त्यांना त्याच शेतीतून 50 लाखाहून अधिकचे उत्पन्न मिळू लागले . आता घुमटमाळ परिसरातील दुसरे उदाहरण आहे मारुती साधू कदम या प्रगतशील शेतकऱ्याने फोंड्या माळरानावर केलेली उसाची शेती.
घुमटमाळचे मारुती नाना कदम सांगतात, आई-वडील आणि आम्ही दहा भावंडे असं आमचं मोठ कुटुंब. घरची दहा एकर शेती असून देखील हातातोंडाची गाठ पडताना मुश्कील व्हायचं. अनेक वेळा जनावरांना देखील वैरण विकतची आणायला लागायची. सततच्या दुष्काळाला कंटाळून अखेर पाच ही भावानी एकाच वेळी विटा सोडून मिळेल ते काम करण्यासाठी मुंबई गाठली. 1980 सालापासून ते 1990 पर्यंत मुंबईत रिक्षा व्यवसाय केला. 1990 साली पुन्हा घरगुती अडचणीमुळे विटा शहरात येऊन रिक्षा व्यवसाय करायला सुरुवात केली. शेती आणि रिक्षा व्यवसायाची सांगड घालून देखील कुटुंबाची घडी गेले 40-50 वर्षात व्यवस्थित कधीच बसत नव्हती.
टेंभूच्या पाण्याने सात
वर्षातच आयुष्य बदलले
विट्यातील घुमटमाळ परिसरात टेंभू योजनेचे पाणी दाखल झाले आणि अवघ्या पाच – सात वर्षातच इथल्या शेतकऱ्यांचा आयुष्यच बदलून गेलं. मारुती कदम सांगतायत, टेंभूचे पाणी आल्यानंतर फोंड्या माळरानावर पुन्हा शेती करायला सुरुवात केली. ट्रॅक्टर आणि जेसीबी च्या साह्याने शेतातील सुमारे 100 हून अधिक ट्रॉल्या दगड बाजूला काढले आणि उसाची लागण केली. आज प्रचंड मेहनतीच्या जोरावर आम्ही एकरी शंभर टना प्रमाणे आम्ही ऊस काढतोय. त्यामुळे ज्या शेतातून सात आठ वर्षांपूर्वी एक रुपया देखील शिल्लक राहत नव्हता त्याच शेतात आता वर्षाला पंधरा लाखाहून अधिक उसाची बिल निघत आहेत. हा चमत्कार झाला आहे तो फक्त टेंभू योजनेच्या पाण्यामुळेच असं मत मारुती नाना कदम यांनी व्यक्त केले आहे.
टेंभू योजनेच्या पाण्यामुळे झालेला हा बदल केवळ रणजीत कदम, संजय कदम या बंधूंचा किंवा मारुती नाना कदम यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही तर ज्याच्या शेतात टेंभू योजनेचे पाणी आलं आहे तो प्रत्येक शेतकरी आता स्वाभिमानाने आणि समृद्धीने खंबीरपणे उभा राहिला आहे.
टेंभूच्या पूर्ततेसाठी
सुहासभैय्यांना बळ देणार
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी गेली तीस वर्षे अखंडपणे परिश्रम घेत टेंभू योजनेचे पाच टप्पे पूर्ण केले आहेत. सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते एक ऑक्टोबर रोजी विटा येथे होणार आहे. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम ताकतीने पूर्ण करून युवा नेते सुहास बाबर यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर तसेच शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी यासाठी लाखोंच्या संख्येने आम्ही शेतकरी बांधव त्यांना शुभेच्छा आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहणार आहोत, असे मत मारुती कदम यांनी व्यक्त केले.