आदरणीय अनिलभाऊ,
सप्रेम जय महाराष्ट्र..!
आज तुमच्या पश्चात तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विटा शहरात आलो होतो. तुम्ही आयुष्यभर ज्या टेंभू जलसिंचन योजनेचा ध्यास घेतलात त्याच टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजनासाठी आज मी इथे आलो होतो. हा टप्पा मंजूर व्हावा यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कुडकुडत्या थंडीत तब्येत बरी नसताना देखील आपण बाहेर बसून होतात. त्या बैठकीत हा टप्पा मंजूर होणारच होता पण तरीही तुम्ही त्याचा ध्यास बाळगला होता. अखेर त्या बैठकीत हा टप्पा मंजूर केल्याची बातमी तुम्हाला शंभुराज यांनी जाऊन सांगितली तेव्हाच तुम्ही तिथून निघालात. आपल्या लोकांसाठी सतत झटणारा तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी या आटपाडी-खानापूर विधानसभा मतदारसंघाला मिळाला हे या मतदारसंघाचे भाग्यच म्हणायला हवे.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला ‘ स्वर्गीय अनिल बाबर ‘ नाव देऊ असे जाहीर केले आहे. तुमचे हे टेंभू योजनेचे अर्धवट राहिलेले स्वप्न महायुती सरकारमधील आम्ही तुमचे सर्व सहकारी नक्की पूर्ण करू एवढाच शब्द तुम्हाला देतो आणि तुमच्या सुहास आणि अमोल या दोघानांही तुमची आणि आदरणीय वहिनीची कमतरता कधीच जाणवणार नाही याची खात्री देतो…
तुमचा विश्वासू
एकनाथ शिंदे.