ठाकरेंवर मतदार संघ सोडण्याची  नामुष्की; खानापूरात लढण्यापूर्वीच माघार


विटा (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सक्षम उमेदवारच मिळत नसल्याने सलग दोन टर्म आमदार असलेला खानापूर विधानसभा मतदारसंघच मित्र पक्षाला स्वतःहून सोडण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. मतदार संघातील दिग्गज नेते माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला उमेदवारीसाठी मुलाखती दिल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे उमेदवाराची मागणी केली आहे.

खानापूर मतदार संघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी २०१४ साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातून पहिले आमदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर पुन्हा २०१९ साली शिवसेनेच्या चिन्हावर अनिलभाऊ आमदार झाले. सलग दोन वेळा शिवसेनेचे आमदार, खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता यासह मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायतीर देखील शिवसेनेचा भगवा फडकवण्यात बाबर गटाला यश आले होते. परंतु एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करत भाजप सेना महायुतीचे नवीन सरकार सत्तेवर आणले. या नवीन सरकारच्या स्थापनेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची भूमिका महत्त्वाचे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वरती विशेष राग होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी विटा शहराचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अनिल बाबर यांना पुन्हा आमदार होऊ देणार नाही. खानापुरातून ठाकरे यांच्या शिवसेनेचाच पुन्हा आमदार होणार, अशी जोरदार वल्गना केली होती. मात्र खानापूर मतदार संघातील ग्राउंड रियालिटी वेगळी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ज्या शिवसैनिकांच्या ताकदीवर बाबर गटाला कधीही आमदारकी मिळू देणार नसल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली होती. त्याच शिवसैनिकांनी आता मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद नाही, त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सोडावा अशी मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारापुढे सपशेल माघार घेतल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातला उद्धव ठाकरेंचा हा एकमेव मतदारसंघ असेल ज्या ठिकाणी सलग दोन टर्म आमदार असताना देखील शिवसैनिकांनी आम्हाला उमेदवारी नको म्हणून मागणी केली असेल.

उद्धव ठाकरेंचे लढणारे शिवसैनिकच ढेपाळल्यामुळे खानापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाला सोडण्याबाबत जवळपास निश्चित होणार असल्याचे चित्र आहे. खानापूर मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाकडे थेट उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे खानापूर मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार रिंगणात असेल, असे सध्याचे चित्र आहे.

आ. पडळकर किंगमेकर : धनगर समाजाचे राज्याचे नेते आ. गोपीचंद पडळकर हे या निवडणुकीत आता किंगमेकर च्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आ. पडळकर आणि वैभव पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख यांचे संबंध चांगले आहेत. परंतु गोपीचंद पडळकर आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष महाराष्ट्राला माहित आहे. अशावेळी पडळकर शरद पवार यांच्या उमेदवाराला मदत करणार की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मदत करणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पडळकर यांना जत मतदार संघातून उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे खानापूर मतदारसंघात पुन्हा एकदा किंग मेकरच्याच भूमिकेत दिसतील हे निश्चित आहे.

संजयकाका की आर. आर. गट : माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख, वैभव पाटील यांच्यापैकी कोणाला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास विसापूर सर्कल मधून आर. आर. पाटील यांचा गट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य करेल, असे सांगण्यात येत आहे. परंतु माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील गटाचे आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचे अत्यंत जवळच्या संबंध आहेत. माजी खासदार संजय काकांना तर वैभव पाटील  आपला राजकीय गुरु म्हणतात. त्यामुळे विसापूर सर्कल मधून संजयकाका आणि आर आर पाटील गट आपापसातील संघर्ष विसरून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठबळ देणार का ? हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.

खानापूर मतदारसंघात कोण कोणाला पाठिंबा देणार ? कोणाला विरोध करणार ? हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या मात्र गेली दहा वर्ष ज्या मतदार संघात शिवसेनेचा आमदार आहे, तोच मतदार संघ स्वतःहून सोडण्याची नामुष्की उद्धव ठाकरेंवर आली आहे ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्यापूर्वीच एका मतदारसंघातून ठाकरे यांनी माघार घेतल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *