सांगली : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे व यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांचा समावेश करावा या मागणीसाठी आम्ही गेली 15 वर्षे लढा देत आहे. अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री डाॅ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आम्हाला न्याय दिला, असे मत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
सूर्यवंशी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. आमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये ठाणे येथील आमदार संजय केळकर यांनी आम्हाला मोलाची साथ दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. याशिवाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, हसन मुश्रीफ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार आशिष शेलार, राजेश क्षीरसागर आदी मान्यवरांसह राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे मालक संपादक यांचे योगदान लाभले त्याबद्दल सर्वाचे आभार.
गेली पंधरा वर्षे आम्ही हा लढा लढत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तपत्र विक्रेता एजंट बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला साथ दिली. या मागणीसाठी वेळोवेळी करण्यात आलेली आंदोलने, मेळावे यासह इतर उपक्रमांमध्ये सर्वांनी ताकतीने साथ दिली त्यामुळेच हे यश मिळू शकले.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करून या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कोणत्या योजना राबवाव्यात, या कल्याणकारी मंडळासाठी निधी कसा उभा करता येईल याबाबतचा अहवाल यापूर्वीच सरकारला सादर करण्यात आलेला आहे. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होऊन या कल्याणकारी मंडळाचे लाभ प्रत्यक्षात मिळण्यास सुरुवात होईल यासाठी आम्ही अधिक ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे
विकास सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.