: जुन्या नगरपालिकेसमोर भूमिपूजन
: सुमारे 88 कोटी 11 लाखाची योजना
: नगरसेवक अमोल बाबर यांची माहिती
विटा ( प्रतिनिधी ) : स्व. आ. अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नांनी विटा शहराला सुमारे 88 कोटी 11 लाख रुपयांची सुधारीत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार सकाळी विटा येथे होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.
बाबर म्हणाले, विटा शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच 88 कोटी 11 लाख रुपये निधीची मंजुरी दिली आहे. विटा शहराला गेल्या काही वर्षात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत होती. विटेकरांच्या मागणीनुसार स्वर्गीय आ. अनिलभाऊ बाबर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या पाणी प्रश्नाबाबत स्वर्गीय सातत्याने आवाज उठवला होता. मंत्रिमंडळ स्तरावर व शासन स्तरावर विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यांनी पाहिलेले हे एक स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत आहे आणि संपूर्ण विटा शहर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे.
या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ विटा येथील जुन्या नगरपालिकेच्या समोरील जागेत, गांधी चौक जुन्या पाण्याच्या टाकीच्या सामोर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 12 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या भूमिपूजन समारंभासाठी विटा शहरातील मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. विटा शहराच्या दृष्टीने हा ऐतिहासिक सोहळा असून या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही अमोल बाबर यांनी केले आहे.
अशी असेल विट्याची सुधारित
नळ पाणीपुरवठा योजना …
1. या योजनेचा उद्भव वाझर या ठिकाणाहून घेण्यात आलेला आहे. या तलावाला टेंभू उपसा सिंचन चे फीडिंग आहे
2. या योजनेत 7.5 किलोमीटर ची उर्ध्ववाहिनी वाझर तलावापासून ते आळसंद जलशुध्दीकरण प्रकल्प पर्यंत प्रस्तावित केली आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वातील योजनेमधील 28 किलोमीटर लांबीच्या उर्ध्व वाहिनी पैकी ९.५५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन बदलण्याचे प्रस्तावित केले आहे.
3. दहा दशलक्ष घनमीटर चा नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे.
4. प्रस्तावित योजनेत विविध व्यासाच्या 76 किमीच्या वितरण वाहिन्या प्रस्तावित केले आहेत
5. या योजनेत 4.75 लक्ष लिटर क्षमतेचे मुख्य संतुलन टाकी प्रस्तावित आहे. तसेच विविध क्षमतेच्या चार उंच साठवण टाक्या प्रस्तावित केलेले आहेत.
6. या योजनेमध्ये शुद्ध पाण्याची १५.५ किमीच्या उर्ध्व वाहिनी प्रस्तावित केलेली आहे
7. १३५ ली प्रति माणशी पाणी पुरवठा संपूर्ण शहरासाठी होणार आहे
8. विटा शहराची २०५१ सालची लोकसंख्या गृहीत धरून नवीन योजना कार्यान्वित होणार आहे.
9. त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याची १२.८ किमीच्या गुरुत्ववाहिनी प्रस्तावित केलेली आहे.