वाळवा (रहीम पठाण) : महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि विकासासाठी स्वर्गीय नागनाथ अण्णा नायकवडी महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, स्वातंत्र्य संग्रामापासून अहोरात्र समाजासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावे स्वतंत्र प्रकल्पग्रस्त महामंडळाची स्थापना करण्याबाबत मुंबई येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी बैठक संपन्न झाली होती. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी 8 जुलै 2024 रोजी या महामंडळाच्या स्थापनेचे निवेदन दिले होते. महाराष्ट्र राज्य धरण व शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी सातत्याने यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या स्वतंत्र महामंडळास आज मंत्री मंडळात मान्यता देण्यात आली
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णानी आपले जीवन हे शेतकरी, कष्टकरी, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी घालवले. या लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन उभी केली. आटपाडी येथे सातत्याने पाणी परिषद घेऊन तेथे पाणी कसे पोहचेल यासाठी लढा उभा केला. आज त्या परीसरात पाणी पोहचले आहे.
अण्णांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेत आज शासन स्थरावरती त्यांचे नावे हे महामंडळ स्थापन झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या महामंडळाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होणार आहे.