मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी शिवराज काटकर


मुंबई / प्रतिनिधी:  सुमारा 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कार्याध्यक्ष म्हणून सांगलीचे पत्रकार शिवराज काटकर आणि सरचिटणीस म्हणून परभणीचे पत्रकार प्रा. सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भोळे यांच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी ही घोषणा केली. रोह्याचे मिलिंद अष्टीवकर हे परिषदेचे नवे अध्यक्ष आहेत.

मराठी पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहात उत्साह पार पडली. कोषाध्यक्षपदी मन्सूरभाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर परिषदेच्या विश्वस्त रिक्त जागेवर माजी अध्यक्ष शरद पाबळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.  याप्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान, नवीन कार्यकारिणीने परिषदेची सूत्र हाती घेतली असून आता पुढील पंधरा दिवसांमध्ये कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष, विभागीय सचिव पदाच्या  नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहितीही एस.एम.देशमुख यांनी याप्रसंगी दिली.


‘ स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेली मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी पत्रकार संघटना आहे. परिषदेने पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून पत्रकारांच्या सुख दुखात सहभागी होण्याची भूमिका परिषदेने घेतलेली असल्याने पत्रकारांनी परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे असं आवाहन एस.एम.देशमुख यांनी केलं आहे.  बैठक यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाचे सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा आदाटे, दीपक पवार आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *