सांगलीत काँग्रेसचा ‘ आत्मघात ‘ ; बंडखोरीच्या दणक्याने खळबळ


सांगली (राजेंद्र काळे)  सांगली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला गेला आहे. पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून ‘सांगली पॅटर्न’ राबवू. स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू, असा इशारा श्री. पाटील यांच्या समर्थकांनी बैठकीत दिला आहे. त्यामुळे अंतर्गत दुफळीतून काँग्रेस पुन्हा एकदा हक्काची जागा गमावणार ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली विधानसभेला पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्यातील उमेदवारीचा वाद अखेर चांगलाच उफाळला आहे. जयश्री ताई यंदा कोणत्याही परिस्थितीत न थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेली दहा वर्षे सलग
सांगली विधानसभेला आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी तळमळीने धडपडणाऱ्या पृथ्वीराज बाबा यांना मोठा धक्का बसला आहे.

सांगलीतून जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्यानंतर काल रात्री पृथ्वीराज पाटील यांच्या घरी बैठक झाली. काँग्रेस नेत्यांनी कोणाच्या दबावतंत्रामुळे घातकी निर्णय घेतला तर काँग्रेसचे नुकसान होणार आहे. पक्षाने सांगलीतील ग्राऊंड रिपोर्ट घ्यावा. पायावर धोंडा मारून घेऊ नये. दहा वर्ष पक्ष जीवंत ठेवणाऱ्या आणि पाच वर्षे मेहनत घेणाऱ्या नेत्याला डावलून पक्षाने आत्मघात करू नये, असे आवाहन मराठा समाज संस्थेचे ए. डी. पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केले.

ते म्हणाले की, काँग्रेस एकजुटीने लढली पाहिजे. पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारीच भाजपचा पराभव करू शकते. आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील त्यांना त्याची खात्री आहे आणि तेच उमेदवारी मिळवून देतील. त्यांनी गेली दहा वर्षे संकट काळात पक्ष वाढवला आहे. गेली पाच वर्षे ताकदीने बांधणी केली आहे. सामान्य माणसापर्यंत पोहचून काँग्रेसच्या विचारांची मजबूत मोट बांधली आहे. कुणाच्या दबावामुळे त्यांना डावलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर सांगलीकर जनता ते सहन करणार नाही. विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्यानंतर ज्या ताकदीने सांगलीकर त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्याच ताकदीने पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील. ज्याने पक्षासाठी संघर्ष केला, त्याला बंड करायची वेळ आणू नये, असा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.

यावेळी माजी नगरसेवक रज्जाक नाईक, माजी उपमहापौर विजय घाडगे, डॉ. राजेंद्र मेथे, किरण सूर्यवंशी, अल्ताफ पेंढारी, शेरुभाई सौदागर, अजय देशमुख, शीतल सदलगे, अजिज शेख, अजीज मेस्त्री, नेमिनाथ बिरनाळे, अल्लाबक्ष काझी, अरविंद पाटील, सुनिल मोहिते, संजय काळोखे, ए. डी. पाटील, विक्रम कदम, महावीर पाटील, युवराज पाटील, गुरुप्रसाद चौगुले, सावळाराम शिंदकर, महावीर पाटील, विजय पाटील, श्रीकांत पाटील, दिनकर साळुंखे, महावीर पाटील, कांतीलाल कोठारी, सुरेश मालानी, अरविंद पाटील, माणिक कालेकर, योगेश पाटील, सुशांत पाटील, गणेश घोरपडे, सचिन कांबळे, वसीम नदाफ, विकास बोंद्रे, पृथ्वीराज बोंद्रे, ओंकार शेरीकर, विक्रम कांबळे सचिन पाटील दीपक परीट प्रदीप निंबाळकर तनिष्क जवळेकर, आदी उपस्थित होते.
———
विश्वजीत कदम यांचे
सोबत नेहमी राहणार

पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी डावलल्यास त्यांना अपक्ष लढवू. विश्वजीत कदम, विशाल पाटील हेच त्यांचे नेते असतील. ते आमदार झाल्यानंतरही विश्वजीत कदम हेच आपले नेते राहतील. आपण कुणीही काँग्रेसचा विचार सोडणार नाही, अशी भूमिका आशिष कोरी यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *