फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य लोकांना दिलासा : संग्रामसिंह देशमुख

0
file_000000003a208208a5fd1f4410ce244a
Spread the love

कडेगाव ( सचिन मोहिते)
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या जनहिताच्या विविध योजनांमुळे शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या लोकाभिमुख निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे नेते संग्रामसिंह देशमुख बोलत होते.

यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या राज्यातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा व वीज बिलांचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने  शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वाढत्या आर्थिक अडचणींच्या काळात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. तसेच वीजबिल माफीमुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळाला असून, शासनाने सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली असून, महिलांना शेत जमिनीच्या सातबारा वरती आणून खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान बरोबर आर्थिक बळ या योजनेमुळे मिळाले असून महिलांच्या सन्माना सोबतच त्यांच्या स्वावलंबनालाही चालना मिळत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

देशमुख पुढे म्हणाले की, ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांना वेळेवर पाणी सोडण्याचा निर्णय हा शेतकरी हिताचा असून, त्यामुळे परिसरातील शेतीला मोठा लाभ झाला आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे.

“फडणवीस सरकारने शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेतले आहेत. लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम हे सरकार करत आहे. अशा जनहिताच्या निर्णयांमुळे राज्यातील जनतेचा शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, डोंगराई दूध संघाचे चेअरमन विश्वतेज देशमुख, किसान मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष विशाल मोहिते, तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड, मजूर फेडरेशन संचालक संजय गोंदील, माजी सरपंच डॉ. सतीश जाधव यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *