विटा ( प्रतिनिधी ) : सांगली जिल्हयातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यास स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना, टप्पा क्रं.६ असे नांव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याबाबतची घोषणा होताच विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठा जल्लोष केला.
विटा येथील रेवानगर येथे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर विटा येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. अवघ्या दोन दिवसातच मुख्यमंत्र्यांनी विटेकरांना दिलेले वचन पूर्ण केले.
स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आणि टेंभू योजनेचे एक खास नाते आहे. टेंभू चा आराखडा तयार करण्यापासून ते टेंभू योजनेच्या अंतिम आणि सहाव्या टप्प्याला कॅबिनेटची मंजुरी मिळेपर्यंत आमदार बाबर यांनी खडतर परिश्रम घेतले. आमदार असताना आणि आमदार नसतानाही त्यांचा टेंभूच्या पूर्णत्वासाठी सुरू असलेला पाठपुरावा कधी थांबला नाही. त्यामुळेच त्यांना जनतेकडून टेंभू योजनेचा जनक अशी उपाधी देण्यात आली.
टेंभू योजनेमुळे झालेला शेतकऱ्यांच्या आयुष्यातील बदल आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे. नुकतेच एका शेतकऱ्याच्या मुलीने टेंभू योजना हीच अनिलभाऊंचे खरे-खुरे स्मारक असल्याचे भावनिक मत व्यक्त केले होते. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात अनिलभाऊंचे मानसपुत्र तानाजी पाटील यांनी देखील टेंभु साठी अनिल भाऊंनी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेऊन शासनाने त्यांचे नाव टेंभू योजनेला द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी घेतलेल्या खडतर परिश्रमाचा यथोचित सन्मान करत नामकरणाची मागणी मान्य केली. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव घेतल्याशिवाय टेंभू योजना पूर्ण होऊ शकत नाही. सहाव्या टप्प्याच्या माध्यमातून टेंभू योजना पूर्ण होत आहे. त्यामुळेच आपण टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव देत आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या सहाव्या टप्प्याला स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना, टप्पा क्रं.६ असे नांव देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला.