विटा (प्रतिनिधी) येथील लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या आदर्श कृषी तंत्र पदविका विद्यालयास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र शासन यांनी शैक्षणिक वर्ष 2025 -26 पासून मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.
विटा, भवानीनगर कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये हे विद्यालय सुरू होत असून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. मराठी माध्यमाचा दोन वर्षाचा हा पदविका कोर्स असून प्रवेश क्षमता साठ विद्यार्थ्यांची आहे. यासाठी संस्थेने सुसज्ज इमारत उभा केली असून तज्ञ व अनुभवी शिक्षकासह सर्व सोयीयुक्त प्रयोगशाळा उभारली आहे, हरितगृहाच्या प्रशिक्षणासह सेंद्रिय शेतीवर विशेष भर दिला जाणार आहे त्याचबरोबर शेतीपूरक विविध उपक्रमाला प्राधान्य देऊन तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे विद्यार्थ्यांना मार्केटिंग प्रशिक्षण व संगणक प्रणाली द्वारे आधुनिक शास्त्रीय शेतीविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली.

गेल्या काही वर्षात झालेल्या सिंचन योजनांमुळे खानापूर, कडेगाव,पलूस, आटपाडी, वडूज, तासगाव या तालुक्यांमध्ये शेतीला चांगले दिवस आले असून शेती व शेतीपूरक व्यवसायाची चलती चालू आहे त्यामुळे युवकांना आधुनिक शेती करण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी या परिसरामध्ये अशा विद्यालयाची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना शेती व्यवसायामध्ये आपले करिअर करता यावे या हेतूने हे विद्यालय सुरू करत आहे. कृषी तंत्र पदविका पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध शासकीय संस्था, निमशासकीय संस्था सहकारी संस्था व शासकीय संस्था यामध्ये नोकरीसह यशस्वी शेती, जोडधंदे व उद्योग करू शकतील प्रवेशासाठी शासन नियमानुसार फी व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.