विटा (प्रतिनिधी) : आळसंद (ता. खानापूर) येथील लिंगेश्वर महाराज मठ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.
बाबर म्हणाले, लिंगेश्वर महाराज मठासाठी निधी मिळावा, यासाठी स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी पाठ पुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांचेकडून “ब” वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांकरीता निधी उपलब्ध करुन देणेबाबत विनंती केली होती. व त्यामध्ये लिंगेश्वर महाराज मठ तीर्थक्षेत्राचा समावेश असावा अशी मागणी केली होती त्यास मान्यता मिळाली आहे.
आळसंद गावालगत असणाऱ्या लिंगेश्वर महाराज मठामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. हे तीर्थ क्षेत्र खानापुर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. या ठिकाणी भक्त निवास होणे ही भाविकांची मागणी व गरज लक्षात घेऊन त्यासाठी हा 1कोटींचा निधी मंजुर झाला आहे. हे भक्त निवास अत्यंत दर्जेदार व सोयी सुविधायुक्त असेल असेही सुहास बाबर यांनी सांगितले.