सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध मल्ल, कुमार महाराष्ट्र केसरी सुरज जनार्दन निकम ( वय. 30, रा नागेवाडी, ता. खानापूर) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकम हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. कुस्ती खेळताना त्याला सतत दुखापत होत असल्याने त्याला नैराश्य आले. अलीकडच्या काळात त्याचा चिडचिडेपणा वाढला होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तो घरात एका खोलीत दार बंद करून बसला होता. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. कुटुंबातील सदस्यांनी त्याला बाहेरून हाका मारणे सुरू केले. परंतु प्रतिसाद मिळत नाही. हे पाहून ग्रामस्थांनी दरवाजा तोडला. यावेळी त्याने गळफास लावून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.
पै. सुरज निकम याचा देह खाली उतरवून सायंकाळी साडे पाच वाजता विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. सूरज हा एक अत्यंत चांगला पैलवान होता. २०१४ मधल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील तो विजेता होता. २०१८ साली त्याने उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळवला होता. आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकीक मोठा करण्याचा त्याचा मनसुबा होता. माती आणि गादी अशा दोन्ही कुस्तीच्या प्रकारात त्याने प्राविण्य मिळवले होते. त्याच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.