विटा बसस्थानकासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर

: सुहास बाबर यांच्या प्रयत्नाला यश

विटा (प्रतिनिधी) : येथील विटा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या विकास कामांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे . विकास कामे व विकास कामाच्या निधीबाबत अनिलभाऊ बाबर हे नेहमी आग्रही असायचे. प्रत्येक स्तरावर आपल्या मतदारसंघात विकास कामे झाली पाहिजेत हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. त्याच पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी देखील आपला खानापूर मतदारसंघ विकास कामात अव्वल ठेवण्याबाबत आग्रही असतात. त्याची चुणूक आत्तापर्यंत त्यांनी खेचून आणलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये दिसून येत आहे.

दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघांमध्ये निधीची कमतरता जाणवेल, तसेच आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या तोडीचे काम होईल का नाही, तसेच एवढा प्रचंड निधी मिळेल का?, विकास कामे होतील का? असे अनेक प्रश्न निर्माण केले जात असताना या सर्व प्रश्नांना सुहास बाबर यांनी आपल्या कामातून उत्तर दिले आहे.आतापर्यंत सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खानापूर मतदारसंघासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे.

विटा बस स्थानक सुसज्ज व्हावे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती.त्यानंतर सुहास बाबर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विटा बस स्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा व एक मॉडेल असे विटा बस स्थानक व्हावे अशी मागणी केली होती.त्याची दखल घेऊन विटा बस स्थानकासाठी तब्बल 15 कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास निधी मधून विटा बस स्थानकाचा चेहरा  मोहरा बदलला जाईल, याची माहिती बाबर यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *