: स्वर्गीय आ. अनिलभाऊ बाबर यांची राज्य सरकारकडून मागणी मान्य
: सुहास बाबर यांचा पाठपुरावा
विटा (प्रतिनिधी) : स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मागणीनुसार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार उपस्थित होते आमदार बाबर यांच्या पाश्चात त्यांनी केलेली मागणी मान्य करून राज्य शासनाने त्यांना एक प्रकारे आदरांजली वाहिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तमाम विणकर समाजातून समाधान होत आहे.
जून 2023 मध्ये विणकर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत आ. अनिलभाऊ बाबर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्यावेळी विणकर समाजाच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. आ. बाबर यांनी त्या बैठकीत विणकर समाजाच्या उन्नतीसाठी विणकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली होती, त्याबाबत सकारात्मक चर्चाही झाली होती.
वर्षानुवर्षे विणकर समाज व त्यांची कृती समिती याबाबत मागणी करत होती त्यास आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या माध्यमातून ही मागणी शासनस्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला व आज अखेरीस त्यास आमदार अनिलभाऊ यांच्या प्रयत्नामुळे यश आल्याचे बोलले जात आहे
महाराष्ट्र राज्यात विणकर समाजाच्या कोष्टी , स्वकुळसाळी, पद्मशाली इत्यादी जाती पोट जाती विशेष मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट आहेत. विणकाम हा त्यांचा सर्वांचा प्रमुख व्यवसाय होता परंतु तो सध्या बंद झाला आहे. त्यांना आधुनिक मशिनरीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत असल्याने मोठ्या कार्पोरेट कंपन्यांनी सदर उद्योग काबीज केला आहे. त्यामुळे विणकर समाज बांधव उद्योगहीन व बेरोजगार झाला आहे. त्यांना रोजगार उभारणीसाठी व इतर लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प व्याजदराने भाग भांडवलाची रक्कम करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विणकर समाजाकरता विणकर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून त्यास भांडवल मिळावे अशी मागणी त्या बैठकीत आ. अनिल भाऊ बाबर यांनी केली होती.
युवक नेते सुहास बाबर यांनी मागील आठवड्यात मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विणकर महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात लक्ष वेधले होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्यासह विविध खात्याचे सचिव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील विटा, इचलकरंजी यासह राज्यातील विविध भागातील विणकर सामाजच्या आर्थिक प्रश्नाबाबत चर्चा केली होती. अखेर आमदार अनिलभाऊ बाबर यांची ही मागणी त्यांच्या पश्चात राज्य सरकारने मान्य केली असून आज हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून प्रत्यक्षात त्याला पन्नास कोटी भाग भांडवल देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. आमदार अनिल भाऊ यांची मागणी मान्य झाल्यामुळे राज्यातील विणकर समाजाच्या वतीने राज्य सरकारचे तसेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव युवक नेते सुहास बाबर यांचे आभार मानण्यात आले.