: सानिकाची राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी
विटा ( प्रतिनिधी ) : राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडामंडळ, भिकवडी (बु.) ची राष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू, सुवर्ण कन्या कु. सानिका चाफे हिची दिल्ली येथे होणाऱ्या ५६ व्या सिनिअर नॅशनल (खुल्या गटात) खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे एकाच वर्षात चार राष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळण्याचा अनोखा रेकॉर्ड सानिका चाफे हिच्या नावावर झाला आहे.
खानापूर तालुक्यातील खो खो खेळाडू सानिका चाफे ही आदर्श माध्यमिक विद्यामंदिर भिकवडी बुद्रुक या शाळेत इयत्ता दहावीत शिकते. अवघ्या सोळा वर्षाच्या सानिकाने यावर्षी संपूर्ण भारतात अनोखी कामगिरी केली आहे. यावर्षी नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात सुवर्णपदक, छत्तीसगड येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक आणि राष्ट्रीय सर्वोच्च असा जानकी पुरस्कार, तसेच छत्तीसगड येथील सहाव्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक अशा तीन राष्ट्रीय स्पर्धात तीन सुवर्णपदक मिळवण्याचा विक्रम सानिकांनी केला आहे. त्याचबरोबर दिल्ली येथे दिनांक २८ मार्च ते १ एप्रिल २०२४ या कालावधीत होणाऱ्या सिनिअर नॅशनल स्पर्धेसाठी सानिकाची निवड झाली आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी महिलांच्या खुल्या गटातील स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सानिकाचे विशेष कौतुक होत आहे. खो खो खेळातील राष्ट्रीय इला आणि जानकी हे दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सानिका ही सांगली जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
या यशामध्ये सानिकाला भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे सहसचिव डॉ. प्रशांत इनामदार सर यांचे पाठबळ लाभले.
तसेच तिचे प्रशिक्षक समीर माने, दत्ता पाटील, विकास तामखडे, प्रियांका शरनाथे मॅडम, जि. प. शाळा, भिकवडी बु. च्या मुख्याध्यापिका सौ. नलवडे मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.