आष्टा (डॉ तानाजी टकले ) : काळी माय अन घरापढील खिल्लार बैलजोडी शेतकऱ्याच खरं वैभव होती. आता सर्जा राजा बैलजोडीची जागा ट्रॅक्टर घेत आहेत. यांत्रिकीकरणाच्या संक्रमणात शेतीचा मानबिंदू ठरतोय तो ट्रॅक्टर..
तीस वर्षांपूर्वी घेतलेल्या ट्रॅक्टरने कुटुंबाची आर्थिक घडी बसली मग ट्रॅक्टर च्या साहाय्याने शेतीत साधलेले नवनवे प्रयोग, फळ प्रक्रियेच्या प्रयोगातून महाराष्ट्र शासनाचा कृषिक्षेत्रातला सर्वोच्च कृषिभूषण पुरस्कार मिळवलेले कृषिभूषण सुनील माने काकांनी ट्रॅक्टरचा जिव्हाळा ऋण जपत कुटुंबीय व राजकीय कृषिक्षेत्रातील नामवंत मित्रपरिवाराना आमंत्रित करीत ट्रॅक्टरचा 30 वा वाढदिवस साजरा केला. आता या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
सव्वालाखी कृषिप्रधान आष्टा नगरीतील सुनील काका म्हणजे भन्नाट माणूस. पैलवान गडी, प्रयोगशील शेतकरी, आष्टा नगरपालिकेचे माजी नगरसेवक. शहरातील तालीम अन गणेश मंडळाचे मार्गदर्शक. शेतीचे प्रयोग करताना संगतीने त्यांना राजकारणाच्या प्रयोगाची आखाड्याची गोडी लागली. अन ते राजकारणात रमले, राजकारणातील काकांचे किस्से बिग बॉस मधील सूरज सारखे फार रंजक आगळे वेगळे गोलीगत.. काकांनी उभारलेले डिजिटल बॅनर तर अफलातून असतात. विधानसभा निवडणुकीच्या निम्मिताने साहेब.. मुंबई शून्य किमी?? … हत्ती झोपला !!.. हे तर विशेष ठरले. काका माजी मंत्री जयंत पाटील यांचे निष्ठावंत. एकदा नगरसेवक व्हावं ही त्यांची इच्छा. ती सार्वत्रिक निवडणुकीतून कधी पूर्ण झालीच नाही अपूर्णच राहिली. मात्र साहेबांनी निष्ठेमुळे स्वीकृत गटातून ती पुरी केली. अन काका नगरसेवक झाले. काकांच घोड गंगेत न्हाल.
आता राजकारणाकडे त्यांचा फारसा कल नसला तरी माने कुटुंबाने शेतीतून समृद्धी साधली आहे. काकांच एकत्र कुटुंब आहे. अनिल, अरविंद दोन बंधू, पुतणे यांच्या मदतीने काकांनी आधुनिकतेची कास धरित शेतीत ऊस, केळी, पपई, पेरू, सीताफळ, पालेभाज्या असे नवनवे प्रयोग साधले आहेत.कुटुंबाची आर्थिक क्रांती साधली आहे.या संक्रमनावस्थेत कुटुंबाचा मानःबिंदू ठरला आहे लाजरी ट्रॅक्टर…
खरं तर आता शेतकऱ्यांच्या घरासमोर ट्रॅक्टर उभा दिसल्यास सधन व आधुनिकतेची कास धरलेला शेतकरी अशी बिरूदावली मनात येते त्या तीस वर्षांपूर्वी घेतलेल्या ” लाजरी “ट्रॅक्टरचा ऋणानुबंध जपण्यासाठी काकांनी वाढदिवसाची भन्नाट कल्पना पुढे आणली. आष्टा पंचक्रोशीत आमंत्रण दिले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा चेअरमन दिलीप पाटील,राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमनआष्टा नगरींचे नेते वैभव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील,मा नगरध्यक्ष झुंझार पाटील, अर्जुन माने, उद्योगपती पोपट झांबरे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकना झाडून निमंत्रण दिले. सासू सासरे, लेकी, सुना, नाती आपतेष्ठ नातेवाईकांना बोलवले अन आपल्या लाजरी (7601) ट्रॅक्टरचा केक कापून 30 वा वर्धापन उत्साहात केला. ‘हौस’ला मोल न्हाय, काका तुमचा नाद खुळा. म्हणीत उपस्थितानी आभारा नंतरच्या कार्येक्रमावर ताव मारला..