: खा. विशाल पाटील यांचा पाठिंबा जाहीर
: सांगली जिल्ह्यात खळबळ
विटा ( प्रतिनिधी ) : आगामी विधानसभा निवडणुकीत सुहास भैय्या तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहू. जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला सुद्धा प्रेम द्यायचं कळतं. आम्ही अपक्ष आहे. त्यामुळे जाहीर सांगायला कोणाला घाबरत नाही, असे म्हणत अपक्ष खा. विशाल पाटील सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला पहिला पाठिंबा जाहीर केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार म्हणून सांगली जिल्ह्यातून विशाल पाटील निवडून आले होते. त्यावेळी खा. विशाल यांना काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मदत केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खासदार विशाल पाटील कोणा कोणाला पाठिंबा देऊन पैरा फेडणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
आटपाडी तालुक्यात खासदार विशाल पाटील आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुहास बाबर शेळ्या-मेंढ्याच्या बाजाराच्या उद्घाटनाच्या निमित्त एकत्र आले. त्यावेळी खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्य असताना थेट महायुतीचे उमेदवार असलेले सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
विशाल पाटील म्हणाले, सुहास भैय्या यांच्या पाठीशी मी ताकदीने उभा राहणार आहे. खरं तर त्यांनी आमच्या बाजूनेच उभे राहावे, यासाठी देखील मी प्रयत्न केला. पण माझे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत. पण तरी देखील आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, असे सांगत खासदार पाटील यांनी महायुतीतून खानापूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असलेल्या सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला.
खासदार विशाल पाटील यांच्या जाहीर पाठिंबामुळे सुहास बाबर यांचे पारडे आणखीनच जड झाल्याचे सांगण्यात येत आहे. खानापूर मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षात अपेक्षित मेळ नसला तरी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, युवा नेते रोहित पाटील हे महाविकास आघाडीचे शिलेदार स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कुटुंबाशी असलेला जिव्हाळा सुहास बाबर यांच्याशी कायम ठेवतील, असे सध्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी थेट महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे याचे पडसाद सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे.