विटा ( प्रतिनिधी ) : समुद्रकिनारी वाळूत घरटे करावे आणि एखादी प्रचंड लाट यावी … ते वाळूचे घरटे वाहून जावे अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते व्हावे …कधी कल्पनाही केली नसेल असे एखादे दिमाखात उभे असणारे वडाचे झाड उन्मळून पडावे…. अन् सारे उजाड होऊन जावे. अवघ्या क्षणात सारे काही अघटीत अन् अकल्पित घडावे…. नियतीने असा सुड उगवावा की दुःखाची त्सुनामी यावी…. अंतकरण करपले जावे आणि मन बधीर व्हावे…. अशा काही घटना घडाव्या की मनाला कायम हुरहूर लागुन रहावी…. असा हृदयद्रावक दुर्दैवी प्रसंग तमाम विटेकरानी अनुभवला. अवघ्या 24 तासाच्या अंतरात पिता -पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपला मुलगा डोळ्यासमोर समुद्रात बुडाला आणि आपण त्याचा जीव वाचवू नाही शकलो ही सल पित्याच्या मनाला लागुन राहिली त्याच विरहात पित्याची प्राणज्योत मालवली …एखादा क्षण क्षणात हातून सुटून जावा आणि तो परत कधीच न यावा, अन् जीवाला घोर लागुन रहावा अशी ही घटना विट्याच्या फासे कुटुंबियांसोबत घडली.
‘उरी हुंदका दाटतोय गोष्ट बापाची सांगताना’ या आशयाची लता ऐवळे यांची एक कविता आहे. विट्यातील विनायक फासे नावाच्या बापाची ही गोष्ट सांगताना खरोखरच नकळत हुंदका दाटतो…विट्यातील फासे कुटुंब तसे मध्यमवर्गीय…. वडील कपड्यांच्या आठवडा बाजार करून उदरनिर्वाय चालायचे थोरला भाऊ त्यांना साथ करायचा. त्याच वेळेस विनायक फासे यांनी स्पर्धा परीक्षा देऊन वित्त व लेखा अधिकारी हे पद मिळवले. अतिशय विनम्र, लाघवी आणि सुसंस्कृत असणारा विनायक सर्वासाठी साहेब झाला पण विटेकरांसाठी तो विनायकच होता. विनायकला सिद्धार्थ नावाचा एक मुलगा होता.. त्याला घरात लाडाने सिद्धू म्हणायचे , शाळेत तो टॉपर होता…सिद्धू मोठा झाला बारावी पास झाला … त्याला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळाला…
आज मंगळवारी त्याच्या कॉलेजचा पहिला दिवस होता… विनायक फासे यांची नोकरी रत्नागिरीत काही काळ झाली होती. त्यामुळे साहजिकच सिद्धू चे शिक्षण रत्नागिरीत झाले होते. रत्नागिरीशी त्यांचा जिव्हाळा होता. सिद्धू मोठ्या कॉलेजला जाण्यापूर्वी रत्नागिरीला जावून यावे जुन्या आठवणी जागवून याव्या… म्हणून फासे कुटुंबीय तिकडे गेले. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. सारे कुटुंबिय समुद्र किनारी गेले होते, अचानक लाटा काळ बनुन आल्या, लाटांचा वेग प्रचंड होता. त्यामधे सिद्धू स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. सिद्धू बुद्धिबळात तरबेज होता…पण जीवनाच्या पटावर नियती त्याला असे ‘ चेक – मेट ‘ करेल असे वाटले न्हवते.आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही. हाता तोंडाशी आलेला आपला पोटचा गोळा डोळ्या देखत नियतीने हिरावून घेतला. आपण काहीही करू शकलो नाही ही हतबलता , अपराधी भावना विनायकला पोखरत चालली होती. लोक त्याला भेटत होते पण मनात भावनांचे काहूर शांत बसत न्हवते. मनाच्या गाभाऱ्यात द्वंद सुरु होते. डोळ्यात अश्रू दिसत न्हवते पण आतल्या आत अंतकरण ओक्साबक्षी रडत होते. त्याचा हा मुका गहिवर लोकांना कळलाच नाही. आयुष्याचा एक एक क्षण, क्षणा क्षणाला त्यांच्या हातून सुटत चालला होता. दिवस कसा -बसा गेला…रात्र खायला उठली….न्हवे तर ती काळ रात्रच ठरली…अखेर मुलगा देवाघरी जावून २४ तासही उलटले नाहीत या वेदना विनायक ला अस्वस्थ करू लागल्या. त्याच्या हृदयाची धडधड वाढत चालली, त्याला दवाखान्यात हलवण्यात आले. पण तो हृदयविकाराचा तीव्र धक्क एका संवेदनशील बापाचा शेवट करणारा ठरला… अखेर पुत्रविरहाने विनायकने जीव सोडला…. अन् मुलांच्यावर जीव कसा असावा याचा वस्तुपाठ विनायक घालुन देऊन गेला. विनायक चे पार्थिव दारात आले तेंव्हा त्याच्या मुलीचा हंबरडा विटेकरांचे काळीज चिरणारा होता. ‘ बाबा’ प्लीज डोळे उघडा ही आरोळी प्रत्येकाचे डोळे ओले करुन गेली. क्षणभंगुर आयुष्याचा असा येणारा प्रत्यय निश्चित क्लेशदायक आहे.
एकाच दिवशी पिता पुत्राचे रक्षा विसर्जन घेण्याची अघटीत घटना आज विट्यात घडतेय…. ही अख्ख्या गावाच्या मनाचा ठाव घेणारी… हृदयाचा ठोका चुकवणारी… श्वास कोंडणारी … अन् निशब्द करणारी अशीच आहे. सेकंदा-सेकंदाला आयुष्याचा सारीपाट पुढे सरकत जातो अन् आपण नेमका कशाचा अभिनवेश बाळगतो याची जाणीव अशा घटनांनी क्षणार्धात होऊन जाते. या स्वार्थाच्या बाजारात कोण मोठा, कोण छोटा यापेक्षा सारेचजण विधात्याच्या हातची कटपुतळी आहोत.. येवढेच शाश्वत….!
संतोष भिंगारदेवे, पत्रकार
९९७५१२३४५३