मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित भाई शहा यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांचे वाटप करताना मित्र पक्षांना धक्का दिल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 22 जागांसाठी अडून बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 8 तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 3 तीन जागांचा प्रस्ताव दिल्यामुळे क्रिकेट मधील ड्रीम इलेव्हन प्रमाणेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ‘ ड्रीम इलेव्हन ‘ लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजप आपल्या सोबत घेऊन मित्र पक्षांना संपवण्याचे काम करतो, असा थेट आरोप अनेक वेळा केला जातो. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात लोकसभेचे तेरा खासदार आहेत. मात्र मागील निवडणुकीप्रमाणेच आम्हाला 22 जागा मिळाव्यात, यासाठी शिंदे आग्रही होते. परंतु तुमचे खासदार किती यापेक्षा निवडून येणाऱ्या खासदारांची यादी द्या, सर्वेक्षणाचे अहवाल काय सांगताहेत ते पहा, असे सांगत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला केवळ आठ जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे समजते. मुंबईत देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नेत्यांची कामगिरी पाहून सहा पैकी केवळ एकाच जागेवर लढण्याच्या सूचना अमित शहा यांनी केल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटाने देखील अमित शहा यांच्याकडे 12 ते 13 जागांवर उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र निवडून येण्याच्या पात्रतेनुसार अजितदादा गटाला देखील केवळ तीनच जागा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने शिवसेना राष्ट्रवादीला केवळ 11 जागांचा प्रस्ताव देत अचूक ‘ जागा ‘ दाखवल्यामुळे क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच शिंदे पवारांची ‘dream11’ लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.